महायुती सरकारमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्री पदे मिळण्याची आशा आहे. जिल्ह्यात निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांमध्ये माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांची या मंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दापोली – खेड विधानसभा मतदार संघातील आमदार योगेश कदम यांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासना नुसार मंत्री मंडळात वर्णी लागणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरीमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने परस्पर विरोधात उमेदवार उभे करीत ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली. यामध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापेकी एकाच जागेवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदार संघातून निवडून आले. तर एका जागेवर चिपळूण मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शेखर निकम निवडून आले. मात्र जिल्ह्यातील इतर तीन मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. यामध्ये दापोली मतदार संघातून योगेश कदम , रत्नागिरी विधानसभेतून उदय सामंत आणि राजापुर मधून किरण सामंत हे निवडून आले. मात्र रत्नागिरी जिल्ह्याला मंत्री पदाची असलेली परंपरा कायम ठेवण्यात उदय सामंत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला यंदा दोन मंत्री पदे मिळण्याची आशा आहे. असे झाल्यास एक मंत्री पद योगेश कदम यांच्या वाट्याला येऊ शकते. तसे आश्वाशन शिंदे यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार करण्यासाठी दापोली मतदार संघात शिंदे यांची जाहीर प्रचार सभा घेण्यात आली होती. या प्रचार सभेत शिंदे यांनी दापोली खेड मतदारांना योगेश कदम यांना निवडून देण्याचे आवाहन करुन आपण योगेश कदम यांना मंत्री करु असे आश्वाशन दिले होते. आता या आश्वासनाची पुर्तता करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या नवीन मंत्री मंडळात योगेश कदम यांना कोणत्या खात्याचे मंत्री पद मिळणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच बरोबर माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पुन्हा तेच खाते मिळण्याची शक्यता वर्तविली जाते.