मोरे माऊली को-ऑप. सोसायटीला राज्यातील एक मोठी पतसंस्था बनवू भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

Spread the love

मुंबई – मोरे माऊली पतसंस्थेला ३७ वर्षे झालीत. हा टप्पा फार मोठा आहे. आता नियोजनबद्ध काम करायचे आहे. मोरे माऊली पतसंस्था ही राज्यातील, मुंबईतील एक मोठी पतसंस्था कशी बनेल याचा विचार करू, असे प्रतिपादन भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे.
मोरे माऊली को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या घाटकोपर शाखेचे रौप्य महोत्सवी वर्ष व नवीन कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यालयाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांच्यासह आमदार सुनिल शिंदे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, रा. जि. प. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, मोरे माऊली पतसंस्थेचे अध्यक्ष एकनाथ निकम, उपाध्यक्ष रामचंद्र महाराज शिंदे, कृष्णा दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, सहकार विषय हा माझ्या आवडीचा विषय आहे. सहकारात ताकद आहे. सहकारात केवळ आपण मोठे होत नसतो तर आपला समाज, ज्यांना कुणाचा आधार नसतो अशांना मोठे करण्याचे काम सहकारी पतसंस्था, सहकार चळवळ करत असते. मोरे माऊली पतसंस्थेने गेली ३७ वर्ष कारभार केलाय. नफ्यात चालणारी आपली संस्था आहे. मात्र संस्था गतीने चालवावी लागणार आहे.
मी गेली २०-२५ वर्ष जिल्हा बँकेचे नेतृत्व करत आहे. मी माझ्या कोकणातील सहकाऱ्यांना सांगतोय कोकणात काहीतरी उभे करा. परंतु एकही माणूस धाडसाने काहीतरी करावे यासाठी पुढे येत नाही. कोकणातील जो जो माणूस चांगले प्रकल्प घेऊन येईल त्याला ताकद देण्याचे काम माझ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून करेन, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला.
दरेकर पुढे म्हणाले की, आपल्या मातीतील उद्योजक तयार होईल ही भावना घेऊन आमच्यासारखी लोकं काम करतात यासाठी तुम्ही पुढे या. तुम्ही सर्वांनी पतसंस्था वाढवा. कारण या संस्था सरकार बरोबर विकासात मोठे योगदान देऊ शकतात. मी आज जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. सरकारच्या बरोबरीने राज्यातील सर्व प्रकल्पांना मदत करतो. यावेळी दरेकर यांनी गिरणी कामगार, माथाडी कामगार, सूत गिरण्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदत केल्याचा उल्लेखही केला.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, रायगड बँक अडचणीतील बँक होती. मी तीला ताकद दिली. अडचणीतून बाहेर काढली. त्या बँकेच्या कोकणात रायगडभर शाखा सुरू करणार आहोत. जोपर्यंत आर्थिक ताकद दिली जात नाही तोपर्यंत आपण उभे राहू शकत नाही. आर्थिक विकासाची चळवळ सहकाराच्या माध्यमातून येणाऱ्या काळात निश्चितपणे करू, असेही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *