मेट्रो स्थानकांवर बस जोडणी व पार्किंगची मागणी; उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचे आयुक्तांना पत्र

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर परिसरातील नव्याने सुरू झालेल्या मेट्रो स्थानकांमुळे नागरिकांना आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला असला तरी स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कनेक्टिव्हिटी नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर ध्रुवकिशोर मन्साराम पाटील यांनी आयुक्तांना पत्र देत बस जोडणी, दुचाकी पार्किंग व रिक्षा स्टँडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
उपमहापौर पाटील यांनी पत्रात नमूद केले की, मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या फीडर बस सेवा तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. विशेषतः पेणकरपाडा गाव, काशीगाव गाव तसेच आसपासच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून मेट्रो स्थानकांपर्यंत पालिकेच्या बसेसची सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच अनेक प्रवासी दुचाकीने मेट्रो स्थानकांपर्यंत येत असले तरी अधिकृत पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनखालील मोकळ्या जागेत ‘पे अँड पार्क’ पद्धतीने शिस्तबद्ध दुचाकी पार्किंग सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्थानकांच्या बाहेर अनधिकृत रिक्षांची गर्दी होत असल्याने प्रवाशांना चालणेही कठीण होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासाठी अधिकृत रिक्षा स्टँड आणि रांगेची व्यवस्था करण्याची मागणी उपमहापौर पाटील यांनी केली आहे.
या सुविधा उपलब्ध झाल्यास मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होईल. त्यामुळे या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *