महाड – प्रतिनिधी
सध्या किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांमध्ये लागणारे बांधकाम साहित्य गाढवांच्या पाठी वरून गडावर वाहून नेले जात आहे. या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या गाढवांचे मात्र या ठिकाणी प्रचंड हाल होत आहेत.
गाढवाचे ठेकेदारांकडून मृत गाढवांना उघड्यावर टाकून दिले जात आहे.
महाड रायगड मार्गावर कोंझर घाटामध्ये जवळपास चार ते पाच गाढवांना उघड्यावर फेकून दिल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे .
ऐतिहासिक किल्ले रायगडच्या विकासा साठी करोडो रुपये मंजूर झाल्यानंतर गेली काही वर्षांपासून विविध विकास कामे सुरू आहेत. रायगड संवर्धना बरोबरच गडावर शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी केल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच संशोधनात्मक कामे सुरू आहेत या कामांसाठी लागणारे बांधकाम साहित्य गडावर नेणे मोठे जिकरीचे काम आहे. रोपवेच्या माध्यमातून काही साहित्य नेले जात असले तरी लागणारी वाळू, घडवले जाणारे दगड, आणि चुना आदी साहित्य गाढवांच्या पाठीवरून वाहून नेले जात आहे. किल्ले रायगडावर जाण्यासाठी सुमारे चौदाशे हून अधिक पायऱ्या आहेत खुबलढा बुरुज, महादरवाजा, या ठिकाणी उभा सरळ चढ आहे, अशा पायऱ्यांवर रायगड किल्ला सर करताना माणसाला दमछाक होते. अशा ठिकाणी या मुक्या प्राण्यांच्या पाठीवर शेकडो किलोचे ओझे लादून गडावर नेले जात आहे. या गाढवांचा सोशल मीडियावर देखील कौतुकाचा विषय व्हायरल झाला आहे. मात्र प्रत्यक्षात या गाढवांचे या ठिकाणी प्रचंड हाल होत असताना दिसत आहेत.
गड सर करताना या गाढवांच्या तोंडाला फेस येतो तरी देखील न थांबता या गाढवांचा प्रवास दिवस – रात्र सुरूच आहे. ठेकेदार गाढवांच्या आरोग्या कडे लक्ष न देता केवळ बिल लादण्यातच गुंग झाले आहेत यामुळे गाढव मृत झाल्याच्या घटना यापूर्वी देखील अनेकदा घडले आहेत.
महाड रायगड रस्त्यावर जुन्या कोंझर घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या जवळच दहा-पंधरा फुट दरी मध्ये मृत झालेली सुमारे पाच ते सहा गाढव निर्दयीपणे उघड्यावर टाकून दिलेली आहेत. आठवडाभरापूर्वी ही गाढव टाकून दिलेली असावी त्यामुळे या घाटामध्ये दुर्गंधी पसरली आहे. एका स्थानिक रहिवाशाच्या हे निदर्शनास आल्यामुळे ही घटना समोर आली आहे. ज्या रायगडाच्या विकासामध्ये या गाढवांचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते त्याच गाढवांचे ठेकेदारांकडून प्रचंड हाल केले जात आहेत. या गाढवांवर ना उपचार केले जात ना त्यांना योग्य आहार दिला जात. अशातच मृत पावल्या जाणाऱ्या गाढवांवर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात नाही. हे या घटनेतून समोर आले आहे. मृत गाढवांना असे उघड्यावर टाकून दुर्गंधी पसरवणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
किल्ले रायगड परिसरामध्ये या गाढवांचे तळ आहेत ठेकेदारांनी आणलेली शेकडो गाढवे उघड्यावर बांधून ठेवली जातात तर त्यांना जाग्यावर आहार दिला जात नाही. उलट गाव परिसरात उघड्या वर सोडून दिले जात आहे. गावभर फिरणाऱ्या या गाढवांची मल मूत्र परिसरात पसरले जात असल्याने यातून देखील मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे रायगडच्या विकासासाठी या अधिकाऱ्यांच्या लोकांकडून पुढे आणले जाते यामुळे स्थानिक ग्रामस्थ देखील बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.
अन्न पाण्यावातून गाढवांचे हाल?
किल्ले रायगडावर सामान वाहून नेणाऱ्या गाढवांना किल्ले रायगड रस्त्यावरील उन्हामध्ये बांधण्याचे काम ठेकेदाराकडून झाल्याचे दिसते या गाढवांना वेळेवर अन्न व पाणी देखील दिले जात नसल्याचे त्या गाढवांच्या पाहणीत आढळून येते एकंदरीत गाढवांचे उन्हात बांधून त्यांचे हाल करीत असल्याचे चित्र देखील यावेळी पाहण्यास मिळाले