नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजयी होत नवी मुंबईतील आपल्या विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणारे भाजप नेते गणेश नाईक यांच्यापुढे या विजयानंतरही संपूर्ण शहरात राजकीय वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान उभे राहीले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात नाईक यांचे धाकटे पुत्र संदीप यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. राज्यभर महायुतीची लाट असताना संदीप यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्रात भाजपला विजयासाठी शेवटच्या दोन फेऱ्यांपर्यत झुंजविले. या चुरशीच्या लढतीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारत नाईकांच्या नवी मुंबईतील एकहाती वर्चस्वाला पुन्हा एकदा वेसण घातली असून नाईक-म्हात्रे हा संघर्ष आगामी काळातही शहरात पहायला मिळणार आहे. नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा अनेक दशके बालेकिल्ला राहीला आहे. २०१४ नंतर देशभरात आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेनंतर मात्र नाईक यांच्या शहरातील या वर्चस्वाला शह मिळाला. मोदी यांची लाट असतानाही त्यानंतर सहा महिन्यातच झालेल्या महापालिका निवडणुकीत नाईक यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या चिन्हावर नवी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली. २०१९ मध्ये मात्र नाईक भाजपमध्ये प्रवेश करते झाले. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणाऱ्या मोठया नाईकांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संदीप नाईक यांनीच भाग पाडल्याची चर्चाही तेव्हा रंगली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही नाईकांना बेलापूर या त्यांच्या आवडत्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते. येथून आमदार झालेल्या मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष गेली पाच वर्ष सातत्याने सुरु होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघर्षाचा नवा अध्याय नवी मुंबईकरांनी अनुभवला. बेलापूर मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत मंदा म्हात्रे यांनी संदीप यांचा निसटत्या मतांनी पराभव केल्याने ऐरोलीतून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊनही मोठया नाईकांपुढे शहरात वर्चस्व राखण्याचे आव्हान कायम असणार आहे.
म्हात्रे -नाईक संघर्षाला धार चढणार ?
बेलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळाली नसल्याने संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून ही निवडणूक लढवली. बेलापूर हा गेल्या काही वर्षात भाजप विचारांच्या मतदारांचा गड मानला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला घसघशीत मताधिक्य मिळते. असे असतानाही संदीप यांनी मंदा म्हात्रे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले. गणेश नाईक यांनी ऐरोलीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. नाईकांसोबत त्यांचे मोठे पुत्र संजीव, पुतणे सागर तसेच नातू संकल्प अशा घरातल्या प्रमुख मंडळींची साथ होती. संदीप यांच्यासोबत त्यांचे चुलत बंधू वैभव नाईक हे बेलापूरच्या प्रचारात दिसले. वैभव यांचा अपवाद वगळला तर नाईक कुटुंबातील एकही व्यक्ती उघडपणे संदीप यांच्या प्रचारात नव्हती. संदीप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना बेलापूर मतदारसंघातील नाईक निष्ठ माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची फौज आपल्या बाजूला घेतली होती. निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक असलेली उत्तम आखणी, प्रचार तंत्र, रसद पेरणीतही संदीप कुठे कमी पडले नाहीत. त्यामुळे एरवी भाजपसाठी सोपी असणारी ही निवडणुक अखेरच्या फेऱ्यांपर्यत रंगत गेली. या निवडणुकीत संदीप यांनी स्वत:चे संघटन कौशल्य दाखविले खरे मात्र त्यांच्या निसटत्या पराभवामुळे बेलापूरात भाजप आणि मंदा म्हात्रे हे समिकरण मात्र त्यांना बदलता आले नाही. म्हात्रे यांच्या विजयामुळे ‘नवी मुंबई नाईकां’ची हा दावा सध्या तरी त्यांच्या समर्थकांना सिद्ध करता आला नसल्यामुळे आगामी काळातही शहरात नाईक आणि म्हात्रे हा संघर्ष पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, नाईक यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील विरोधकांनाही यामुळे बळ मिळाले आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपमधून निवडून आलेल्यांपैकी ज्येष्ठ नेत्यांमध्ये गणेश नाईक यांचा क्रमांक वरचा आहे. यापुर्वी त्यांना मंत्रीपदाचा अनुभवही आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्री मंडळात त्यांची वर्णी लागते का याकडे नाईक समर्थकांचे लक्ष लागून राहीले आहे. संदीप यांचे बेलापूरमधील गणित थोडक्यात हुकले नसते तर नाईक यांचा मंत्रीपदावरील दावा अधिक मजबूत राहीला असता असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.