मुंबईत बेकायदेशीर डोम लाईट्सवर वाहतूक पोलिसांचा ‘फ्लॅश’ अ‍ॅक्शन; ८० वाहनांवर कारवाई, ३ सायरन जप्त

मुंबई : शहरात खासगी आणि अनधिकृत वाहनांवर बेकायदेशीरपणे लाल, निळे व पिवळे डोम लाईट्स (फ्लॅशिंग दिवे) लावून फिरणाऱ्यांविरुद्ध मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ३ सायरन जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईत काही खासगी वाहन चालकांकडून व्हीआयपी असल्याचा आव आणण्यासाठी वाहनांच्या टपावर फ्लॅशिंग दिवे लावले जात असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढल्या होत्या. या दिव्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही दिशाभूल करण्याचे प्रकार घडत असल्याची बाब मुंबई वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर १ एप्रिल आणि २ एप्रिल २०२६ रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहरात विशेष मोहीम राबवली. सहायक पोलीस आयुक्त, दक्षिण मध्य विभाग, मरीन ड्राइव्ह वाहतूक विभाग आणि बांद्रा वाहतूक विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहनांवरील बेकायदेशीर डोम लाईट्स काढून जप्त करण्यात आले. तसेच तीन सायरनही जप्त करण्यात आले असून संबंधित वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, यापुढे अशा प्रकारचे डोम लाईट्स किंवा सायरन खासगी वाहनांवर आढळल्यास संबंधित वाहन चालक व मालकांवर जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. गंभीर प्रकरणांमध्ये वाहनाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली जाईल, तसेच गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो.
दरम्यान, नागरिकांना देखील वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर दिवे लावलेल्या वाहनांची माहिती फोटोसह मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत एक्स (X) हँडलवर किंवा ट्रॅफिक हेल्पलाईनवर कळवावी. मुंबईत कायद्याचे पालन करण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *