२००२ साली हिट अॅन्ड रन प्रकरणात अडकलेला सलमान खान पूर्वीपासूनच साहसी होता, असं त्याचा मित्र आणि सहकलाकार आसिफ शेखने एका मुलाखतीत सांगितलं. सलमान खानचे असे साहसी उद्योग सातत्याने समोर येत असतात. यामुळे कधीकधी तो चाहत्यांची वाहवाह मिळवतो तर कधी कायदेशीर कारवाईला सामोरे जातो. आसिफ खानने असाच एक किस्सा एका मुलाखतीत शेअर केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
द लल्लनाटॉपच्या मुलाखतीत आसिफने १९९८ च्या बंधन चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “सलमान खान पूर्वीपासूनच रिस्क घेणाऱ्यातला होता. त्यावेळी सलमानकडे एस्टीम गाडी होती. एकदा त्याने शूटींगहून घरी परतताना मला लिफ्ट दिली. त्यावेळी तो फूटपाथवर, रस्त्यावर गाडी चालवू लागला. त्यामुळे मी त्याला घाबरून म्हणालो की सलमान खान आपण पकडले जाऊ. तर तो म्हणाला, पकडले गेलो तरी मी सलमान खान आहे, घाबरू नको.” “तेवढ्यातच एका ट्रॅफिक पोलिसाने आम्हाला पकडले. त्यांनी गाडीच्या काचा खाली केल्या. पण ट्राफिक पोलिसांनी सलमानला ओळखलेच नाही. मी म्हणालो की, “अरे याने ओळखलंच नाही. आता शर्ट काढून दाखव म्हणजे पोलीस ओळखतील.”
आसिफच्या मित्रालाही सलमानने घाबरवलं होतं
पुढे त्याने हैदराबाद येथे शूट झालेल्या औझर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, माझा मित्र त्याची नवीन कार दाखवण्याकरता सेटवर आला होता. तेवढ्यात सलमान खान सेटवर आला. माझ्या मित्राला घाबरवण्याकरता त्याने त्याची कार बेदरकारपणे चालवली. त्यामुळे माझा मित्र घाबरला. पण सलमान खान नंतर यावर प्रचंड हसला, कारण तो त्याची फक्त मस्करी करत होता. दरम्यान, २००२ साली झालेल्या हिट अॅन्ड रन प्रकरणी सलमान खानला २०१५ मध्ये क्लीन चिट मिळाली. सलमानविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्याच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला होता. तर, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराजवळ लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळेही सलमान खान चर्चेत आला आहे. बाबा सिद्दीकी यांचे सलमान खानबरोबर चांगले संबंध होते, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केल्याचं समोर येतंय. तसंच, गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत.