मीरा रोड : मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहव्यापारावर काशिमीरा पोलिसांनी धडक कारवाई करत ‘मिरा स्पा’ सेंटरचा भंडाफोड केला. या कारवाईत दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर स्पा सेंटरचा चालक आणि मालक फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालयांतर्गत मीरा रोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणपत पिंगळे यांना गुप्त माहिती मिळाली होती. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा-भाईंदर रोडवरील शालीभद्र बिल्डिंगमधील ‘मिरा स्पा’ सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर एसीपी कार्यालयाची टीम आणि काशिगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरमधील एक कॅशियर आणि एक कामगाराला ताब्यात घेतले तसेच दोन पीडित तरुणींना देहव्यापाराच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले. तपासात ग्राहकांकडून सुमारे दहा हजार रुपये घेऊन मसाजच्या नावाखाली देहव्यापारासाठी मुली उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे उघड झाले. तसेच या स्पा सेंटरची मुंबईतील साकीनाका-अंधेरी परिसरात ‘दीप स्पा’ नावाची शाखा असल्याचीही माहिती समोर आली आहे. छाप्याची माहिती मिळताच एक व्यवस्थापक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी स्पा सेंटरचा चालक व मालकाला फरार घोषित केले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच पीटा अॅक्टच्या कलम ३, ४, ५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन पीडित तरुणींना बोईसर (पालघर) येथील रेस्क्यू फाउंडेशन सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, झोन १ चे डीसीपी राहुल चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, हवालदार नामदेव जोशी, सागर कदम, पीएसआय कांबळे, एएसआय नितीन महाजन, एएसआय वैष्णवी यंबर आणि संबंधित पथकाने संयुक्तपणे केली.