मीठ विभागाच्या जमिनी हस्तांतरणासाठी केंद्राकडे धाव;

  • उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मीठ विभागाच्या जमिनी लवकरात लवकर महानगरपालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, अशी मागणी मिरा भाईंदर महापालिका उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
मीरा-भाईंदरच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरात रस्ते, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांची मोठी गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्यासाठी मीठ विभागाच्या जमिनी अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत या जमिनींच्या अधिग्रहणासंदर्भातील प्रस्ताव मीठ आयुक्तांकडे यापूर्वीच सादर करण्यात आले असून मीरा-भाईंदर महानगरपालिकेनेही २२ सप्टेंबर २०२५ रोजी अंतर्गत धोरण मार्गदर्शक तत्त्वे (IPG) २०२४ नुसार आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रस्तावामध्ये सुभाषचंद्र बोस मैदान ते मेट्रो-९ कारशेडदरम्यान ४५ मीटर रुंदीचा डीपी रोड उभारणे, मीरा रोड पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधणे, भाईंदर पश्चिम येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे तसेच राई, मुर्धा आणि मोरवा गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची पुनर्बांधणी या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
तसेच आरक्षण क्रमांक ९१ येथे स्टेडियम उभारणी आणि चौक येथील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याच्या नूतनीकरणासाठीही या जमिनी आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाठविलेल्या पत्राचाही संदर्भ देत उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे (DPIIT) अंतिम मंजुरी लवकर देण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी विनंती पाटील यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास मीरा-भाईंदर शहरातील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना गती मिळून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *