मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा व मलनिसारण विभागाने राबविलेल्या विशेष पाणीपट्टी वसुली मोहिमेला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३१ मार्च २०२६ अखेर १०९.९० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ही वसुली एकूण ९६.८० टक्के इतकी असून चालू वर्षातील वसुली ९८.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक, मिटर रिडर आणि वितरण व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी थकबाकीदारांची यादी तयार करून प्रत्यक्ष भेटी, नोटीस बजावणे, थकीत रक्कम भरण्यास प्रवृत्त करणे तसेच थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान महानगरपालिका क्षेत्रातील ९५ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या. तसेच अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांच्या थकीत पाणीपट्टीसंदर्भात ६१.१७ लाख रुपयांचा निर्लेखन प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास मंजुरी मिळाल्यास वसुली टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणीपट्टी वसुलीसाठी जनजागृती मोहीमही राबविण्यात आली. ऑटोरिक्षांद्वारे ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात आल्या तसेच थकबाकीदारांच्या घरोघरी जाऊन वसुली करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन, ‘MY MBMC’ मोबाईल अॅप तसेच POS मशीनद्वारे पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले. मागील तीन वर्षांतील वसुलीचा आढावा घेतला असता, २०२३-२४ मध्ये ९४.८२ टक्के, २०२४-२५ मध्ये ९६.६३ टक्के तर २०२५-२६ मध्ये ९६.८० टक्के वसुली झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपट्टी वसुलीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे विभागाने नमूद केले. ही कामगिरी कार्यकारी अभियंता शरद नाणेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा व मलनिसारण विभागाने केली आहे.