मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना मालमत्ता कर वेळेत व पूर्णपणे भरण्याचे आवाहन करण्यात आले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कर वसुलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसूल स्रोत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महानगरपालिकेकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांचा ऑनलाईन भरण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. डिजिटल माध्यमातून पारदर्शकता आणि सोयीसुविधा वाढत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, थकबाकीदारांवर नोटिसा बजावणे, जप्तीची कारवाई तसेच नळजोडणी खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता कर भरणा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, २३ मार्च २०२६ पर्यंत एकूण ₹२४३ कोटींहून अधिक मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. प्रभागनिहाय वसुलीतही लक्षणीय प्रगती झाली असून, शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
३१ मार्च २०२६ पूर्वी कर भरणा करून शहराच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.