दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर २३३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात २४ वर्षीय मार्को यान्सन दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने केलेल्या भेदक आणि धारदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. त्यामुळे मार्कोच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघ शानदार पद्धतीने विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. यासह मार्को यान्सनने या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले.
मार्को यान्सनने केली अप्रतिम गोलंदाजी –
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळला गेला. या कसोटीच्या पहिल्या डावात मार्को यान्सनने केवळ १३ धावा दिल्या आणि ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या आधी श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती आणि संघ अवघ्या ४२ धावांवर गडगडला होता. यानंतर दुसऱ्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या.मार्को यान्सनने अशाप्रकारे दोन्ही डावात एकूण ११ विकेट्स घेत मोठा विक्रम केला. तो डर्बनच्या मैदानावर कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. त्याने मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली. मुरलीधरनने २००० मध्ये डर्बन कसोटीत ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर मार्को यान्सनने भारताच्या व्यंकटेश प्रसादचा २८ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. व्यंकटेशने १९९६ मध्ये डर्बन येथे झालेल्या कसोटी सामन्यात एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान –
श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. संघ आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा अजूनही अबाधित आहेत. आतापर्यंत एकूण ९ कसोटी सामन्यांपैकी आफ्रिकेने ५ जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. त्याची पीसीटी टक्केवारी ५९.२६ आहे.