“महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, भाजपाला हरवायचं असेल तर…”; संजय राऊत यांचं वक्तव्य

Spread the love

Sanjay Raut महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नाही. जागावाटपावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष यांच्यात काही प्रमाणात मतभेद झाल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले जागा वाटपाची गाडी अडली आहे. भाजपाला हरवायचं असेल तर लवकरात लवकर जे काही पेच असतील ते सोडवले पाहिजेत. तसंच काँग्रेसला त्यांनी एक सल्लाही दिला आहे. “आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णयापर्यंत येण्याची गरज आहे. मला कारणांमध्ये पडायचं नाही पण नक्कीच २०० पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात माझी आज उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. कुणाच्या काय भूमिका आहेत हे त्यांना सांगितलं आहे. आज सकाळी मी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे रमेश चेन्नीथेला यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींशीही मी चर्चा करणार आहे. काही जागांवर गाडी अडली आहे त्यातून ब्रेक निघाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे.” असं संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सगळ्यांना पक्ष चालवायचे आहेत आणि टिकवायचे आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन जास्त खेचाखेची बरी नाही हे आम्हालाही माहीत आहे. निर्णय लवकर झाले पाहिजेत कारण भाजपाचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात भाजपा, अमित शाह आणि मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्या भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. आम्ही सगळा त्रास सहन करुन आम्ही उभे आहोत. असंही राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यात…

काँग्रेसची एक यंत्रणा आहे, त्यांना यादी दिल्लीला पाठवावी लागते. आमचं असं म्हणणं आहे की हे निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगाने होतील. शिवसेना, राष्ट्रवादी यांचे पक्ष महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे की तातडीने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं दिसतं आहे.तसंच आम्ही हे सांगू इच्छितो, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काही स्वतंत्र संस्थान नाही. रामटेकसारखी सहावेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. आम्ही आता अपेक्षा ठेवल्या तर चुकीची आहे असं वाटत नाही.आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात. जे रामटेकच्या बाबतीत आहे तेच अमरावतीच्या बाबतीत आहे. असंही संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने काही काही निर्णय घेतले आहेत जे सत्ताधाऱ्यांना धार्जिणे आहेत. आम्ही त्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना काही गोष्टी लक्षात आणून देणार आहोत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *