‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीला सुद्धा हास्यजत्रेच्या निमित्ताने एक नवीन ओळख मिळाली. तिचं ‘वाह दादा वाह’ असे डायलॉग बोलणं, खळखळून हसणं या गोष्टी प्रेक्षकांना भुरळ पाडतात. प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे. पण, हास्यजत्रेत काम करण्यासाठी अभिनेत्रीने सुरुवातीला नकार दिला होता. अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने निर्मिती केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे आपला ड्रीम प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राजक्ताने भरपूर मेहनत केल्याचं गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळालं. अशाच एका मुलाखतीत संवाद साधताना प्राजक्ताने हास्यजत्रेबद्दल खुलासा केला. ‘मिरची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने सुरुवातीला हास्यजत्रेसाठी नकार दिला होता असं सांगितलं आहे. यानंतर तिचा नकार होकारामध्ये कसा बदलला जाणून घेऊयात…
प्राजक्ता म्हणते, “झी मराठी’वर मी ‘गूड मॉर्निंग महाराष्ट्र’ हा शो होस्ट केला होता. त्यानंतर मी काहीच होस्ट केलं नव्हतं. त्यामुळे, हास्यजत्रेच्या टीमला वाटलं आपण हिला सूत्रसंचालनासाठी विचारूया. त्यांनी संपर्क केल्यावर मी लगेच सांगितलं… नाही! मला जमणार नाही. एकतर रिअॅलिटी शो, त्यातही कॉमेडी कार्यक्रम… माझा खरंच काहीच संबंध नाही. मी उगाच पंच पाडेन… मला खरंच याचा काहीच गंध नाही, सेन्स ऑफ ह्युमर नाही. त्यामुळे जमणार नाही. असं मी त्यांना सांगितलं होतं.” “पुढे, दोन दिवसांनी परत त्यांचा मला फोन आला. तुझं पेमेंट आम्ही वाढवतोय…प्लीज या पेमेंटला तरी कर. पण, आम्हाला तू हवी आहेस. त्यावेळी शेजारी माझा एक मित्र बसला होता. तो मला म्हणाला, ‘अगं तू का नाही करत आहेस? एवढे चांगले पैसे देत आहेत तुला’ यावर मी त्याला सांगितलं, ‘अरे मला नाही करायचंय… मला ते जमणार नाही.’ तो लगेच म्हणाला, ‘हे तू केल्याशिवाय कसं म्हणतेस? एक शेड्यूल करून बघ. नाही जमलं तर नको करू.” असं प्राजक्ताने सांगितलं. प्राजक्ता पुढे म्हणाली, “माझ्या मित्राने सांगितलेला मुद्दा मला पटला. केल्याशिवाय मला कळणार नाही…ही गोष्ट मला सुद्धा माहिती होती. सुरुवातीला शोमध्ये माझे पाय थरथरायचे. कारण, समोर प्रसाद ओक बसलेले असायचे. ते चुका काढतील अशी भिती होती. सुरुवातीचे दिवस कठीण गेले पण, नंतर मी रुळले. आता मला प्रतिक्रिया येतात…तुला हसताना पाहून आम्हाला खूप छान वाटतं.” अशाप्रकारे अभिनेत्री प्राजक्ता माळी आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाली.