महाड( प्रतिनिधी.) जगाच्या इतिहासामध्ये २० मार्च १९२७ या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह करून समस्त मानव जातीला समानतेचा संदेश दिला. या महत्त्वपूर्ण क्रांतिकारी दिनाचा ९९ वा वर्धापन दिन २० मार्च २०२६ रोजी महाड येथे लाखो आंबेडकर यांच्या अनुयायांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाडचे चवदार तळे हे केवळ एक पाण्याचे ठिकाण नसून भारतीय इतिहासातील समता, न्याय आणि मानवी हक्कांच्या संघर्षाचे एक जिवंत प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी येथे केलेला सत्याग्रह हा आधुनिक भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो.
या ऐतिहासिक ठिकाणा बद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१). ऐतिहासिक पार्श्वभूमी
त्याकाळी सार्वजनिक पाणवठ्यांवर दलितांना पाणी पिण्यास बंदी होती. १९२३ मध्ये मुंबई कौन्सिलने सर्व सार्वजनिक ठिकाणे सर्वांसाठी खुली असावीत असा ‘बोले’ कायदा संमत केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. हा सामाजिक अन्याय मोडीत काढण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेबांनी महाड येथे सत्याग्रह करण्याचे ठरवले.
२). सत्याग्रहाचा दिवस:
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या हजारो अनुयायांसह चवदार तळ्यावर गेले. त्यांनी स्वतः तळ्याचे पाणी आपल्या हाताने प्राशन केले. हा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर अस्पृश्यांनाही मानवी हक्क आहेत आणि ते समान आहेत हे सिद्ध करण्यासाठी होता.
या घटनेला ‘पाण्याचे रणसंग्राम’ असेही म्हटले जाते.
३). महाड सत्याग्रहाचे महत्त्व
या घटनेने दलितांमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली.
याच आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात (२५ डिसेंबर १९२७) विषमतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘मनुस्मृती’ ग्रंथाचे दहन करण्यात आले. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता, ज्यांना बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन केले होते.
आज महाड (जि. रायगड) येथील हे तळे एक प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते. तळ्याच्या मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असून, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सक्षमीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.
”पाणी पिऊन कोणी अमर होत नाही, पण मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेला हा लढा न्यायाचा आहे.” असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीला संदेश दिला आहे.
अशा या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व ओळखून राज्य शासनाकडून यावर्षीचा चवदार तळे सत्याग्रहाचा 99 वा वर्धापन दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे. यावर्षीच्या वर्धापन दिनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महाड मधील क्रांती स्तंभ परिसरामध्ये भव्य सभा मंडपाची उभारणे यासाठी करण्यात येत असून सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन सत्याग्रहाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.