‘मन्नत’ बाहेर ९५ दिवस किंग खानच्या भेटीसाठी थांबला चाहता, आर्यन खानसाठी लिहिली स्क्रिप्ट; पण…

Spread the love

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) त्याच्या पहिल्या ओटीटी वेब सीरिजच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आर्यनची ही सीरिज ‘स्टारडम’ नावाने प्रसारित होणार असल्याची चर्चा आहे. या सीरिजमधून आर्यन दिग्दर्शक आणि लेखक म्हणून पदार्पण करणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित ही वेब सीरिज बॉलीवूड स्टार्सच्या जीवनातील संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकणार आहे. आर्यन सध्या पडद्यामागील सूत्र सांभाळत असला तरी तो लवकरच अभिनय क्षेत्रातही पदार्पण करणार असल्याची माहिती शाहरुख खानच्या एका चाहत्याने दिली आहे. या चाहत्याने ९५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर किंग खानला भेटून आपले स्वप्न पूर्ण केले. झारखंडच्या शेख मोहम्मद अन्सारी या चाहत्याने अखेर शाहरुखची भेट घेतली आणि त्याच्याबरोबर फोटोसुद्धा काढले.

आर्यन करणार सारा अली खान बरोबर पदार्पण?

‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात शेख मोहम्मद अन्सारी या चॅनेलच्या प्रतिनिधीबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. या कॉलदरम्यान अन्सारीने शाहरुख खानबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अन्सारीने सांगितले की, शाहरुखने स्वत: आर्यनच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाची बातमी दिली आहे. तसेच या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत असेल, असेही त्याने उघड केले. शेख मोहम्मद अन्सारीने सांगितले, “मी आर्यन खानसाठी लिहिलेली एक कथा सादर करण्यासाठी शाहरुखला भेटायला गेलो होतो. तेव्हा शाहरुखने मला सांगितले की, त्याने आधीच आर्यनसाठी एक स्क्रिप्ट लिहिली आहे. त्याचा चित्रपट ‘किंग’ रिलीज झाल्यानंतर एक वर्षाने आर्यनचा सिनेमा येईल, ज्यात आर्यन खान आणि सारा अली खान एकत्र दिसतील.” शेख मोहम्मद अन्सारी या शाहरुखच्या चाहत्याने आर्यन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असे सांगितले असले तरी आर्यनला अभिनयात रस नसल्याचं शाहरुख खानने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्याला केवळ कॅमेऱ्याच्या मागे काम करायला आवडतं. परंतु, सिनेमाची पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्म घेतल्याने आणि सुपरस्टारचा मुलगा असल्याने आर्यनही त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. सध्या आर्यन खान ‘स्टारडम’ या सीरिजमध्ये व्यग्र आहे. ‘रेड चिलीज’च्या बॅनरखाली ही सीरिज तयार होत असून यामध्ये ‘किल’फेम लक्ष्य प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर आधारित काल्पनिक गोष्टींवर ही मालिका असणार आहे. त्यात शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर, रणवीर सिंह, बॉबी देओल, बादशाह यांसारख्या बड्या कलाकारांचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *