मीरा-भाईंदर : भाजप तर्फे रविवारी २०/१०/२०२४ रोजी भाईंदर पश्चिम येथील लोटस मैदानावर संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १४५ मीराभाईंदर विधानसभा जागेवर भाजपने दावा केला असून माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणे व कार्यकर्त्यांत उत्साह वाढवणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे. संकल्प सभेबाबत सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळेस १४५ विधानसभा निवडणूक लक्षवेधी होणार आहे
मीराभाईंदरमधून महायुतीचा उमेदवार नक्की कोण असेल याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. येथून अपक्ष आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, ऍड.रवी व्यास आणि शिवसेना (शिंदे) नेते विक्रम प्रताप सिंहही आपला दावा मांडत आहेत.
भाजप मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी सांगितले की, १४५ विधानसभा ही भाजपची जागा आहे. येथून फक्त आमचा उमेदवार असावा. येथे नरेंद्र मेहता हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पहिली पसंती आहेत. ते म्हणाले की, संकल्प सभा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्साही करेल जेणेकरून ते निवडणुकीची तयारी करू शकतील. स्थानिक कार्यकर्त्यांची पहिली पसंती म्हणून जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांची वर्णी लावली आहे. विशेष म्हणजे गीता जैन यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून तिकीटाची मागणी केली आहे. मात्र, जैन यांना भाजप-शिवसेना (शिंदे) हायकमांडकडून तिकिटाची अपेक्षा असली तरी त्यांना अद्याप दोन्ही पक्षांच्या स्थानिक संघटनांकडून पाठिंबा मिळाला नसल्याचे बोलले जात आहे तसेच मिरा भाईंदर मधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्या कडून जैन यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे.