महाराष्ट्रात मतदान सुरु असतानाच हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आणि दमदाटी झाल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. याबाबत शर्मिला पवार ( Sharmila Pawar ) यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. मात्र अजित पवार यांनी हे आरोप फेटाळले आहेत. शर्मिला पवार ( Sharmila Pawar ) यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळालं. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे. यावेळी युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार ( Sharmila Pawar ) यांनी बोगस मतदान आणि दमदाटी झाल्याचा आरोप केला आहे. बारामती पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे असं शर्मिला पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
शर्मिला पवार यांनी काय म्हटलं आहे?
“या ठिकाणी दमदाटी करण्यात येते आहे. जिथे मतदान करतात तिथे एकजण या या बसा, मतदान केलं का? असं खुणा करुन विचारत होता. आम्ही त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दमदाटी करण्यात आली. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आमचा कार्यकर्ता मौसिन याला सांगण्यात आलं तुला बघून घेईन.” मात्र अजित पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. “माझ्या कानावर या बातम्या आल्या आहेत. मी सदर प्रकरणाची माहिती घेते आणि तुम्हाला सांगते.” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. शर्मिला पवार यांचा आरोप धादांत खोटे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आम्ही एवढ्या निवडणुका पार पडल्या पण आमच्या कार्यकर्त्यांनी कधीही अशी काही वक्तव्य केली नाही. आमची विचारधारा शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. आम्ही कधीही असं करणार नाही. उमेदवार, कार्यकर्ते स्लीप देतात. घरुन येताना चिन्ह फाडायचं असतं. हा संकेत सुरुवातीपासूनच आहे. त्यात वावगं काहीही नाही. दुपारी १ वाजून गेला पण मतांची टक्केवारी कमी आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तक्रार केली आहे तर निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करतील. कुठेही बोगस मतदान झालेलं नाही रे बाबा.. असंही अजित पवार म्हणाले.