राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. निर्मल नगर येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. तसंच, या हल्ल्यातील काही संशयित आरोपींना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांकडून पोलिसांनी तीन पिस्तुल जप्त केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तूल, टर्किश पिस्तूल आणि एक देशी बनावटीची पिस्तूल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
…म्हणून आरोपींनी वापरली नाही दुचाकी
कुर्ल्यातील पोलीस पटेल चाळ येथे हल्लेखोर धर्मराज कश्यप, शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम व गुरमेल सिंह राहत होते. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात प्रवीण लोणकर व शुभम लोणकर व मोहम्मद झिशान अख्तर यांच्याशी झालेल्या बैठकीत शिजला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून नियमित वांद्रे परिसरात सिद्दीकी यांचे घर व कार्यालयाची पाहणी करायचे. त्यांनी दुचाकीवरून येऊन सिद्दीकींची हत्या करण्याचा कट रचला होता. पण पाहणी करताना दुचाकीचा अपघात झाला. त्यामुळे त्यांनी हत्येच्या दिवशी दुचाकी न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हल्ल्याच्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरला तासभर आधी हल्लेखोर वांद्रे पूर्वी येथे पोहोचले होते. गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत. दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधारकार्ड जप्त करण्यात आली होती.