बोईसर : बोईसरजवळील सरावली अवध नगर येथील चाळीत रात्री उशिरा एका अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन परिसर हादरला. या स्फोटात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत हद्दीमधील अवध नगर परिसरात असलेल्या अलशिफा गल्लीतील दुबे चाळीमधील एका खोलीत बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे खोलीच्या भिंती कोसळल्या असून आजूबाजूच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात हलवले. सुरुवातीला हा स्फोट सिलेंडरमुळे झाल्याचा संशय होता, मात्र अधिक तपासात खोलीतील कपाटातील संशयास्पद वस्तू किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्या दृष्टीने रात्री उशिरा घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करून अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले आहे. बोईसरमधील अवधनगर परिसर हा संवेदनशील मानला जात असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गजबजलेल्या ठिकाणी संशयास्पद स्फोट झाल्याने खळबळ माजली आहे.