पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नागपूरमध्ये येणे, त्यांनी मुक्काम करणे हे वरवर निवडणूक प्रचाराचा एक भाग वाटत असला तरी ज्यांना पवार यांच्या राजकारणाचा अभ्यास आहे, त्यांच्यासाठी पवार मुक्कामी येणे या मागे निश्चित हेतू असणे, असे मानले जाते. नागपूरमध्ये त्यांच्या दौऱ्यातील घडामोडी व रात्री त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचा कल लक्षात घेता पवार यांनी नागपूरच्या राजकारणात बारकाईने लक्ष घातले, हे स्पष्ट होते. पवार विरुद्ध भाजप हा राजकारणातील संघर्ष नवीन नाही, पण पवार यांनी २०१९ मध्ये केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपच्या नागपूरच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतरचा सर्व घटनाक्रम सर्वांना ज्ञात आहे. शह-काटशहाच्या राजकारणात अनेकदा भाजपने पवार यांची कोंडी केली तर पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत त्यांची शक्ती दाखवून दिली. त्यानंतरची होणारी विधानसभा निवडणूक ही पवार-भाजप संघर्षाची पुढची पायरी मानली जाते. त्यामुळेच पवार यांनी विदर्भातील प्रचारासाठी नागपूर निवडणे, भाजपच्या बालेकिल्ल्यात येऊन जाहीर सभेत नागपूरचे प्रकल्प गुजरातला कोणी नेले ? असा सवाल करून नागपूरच्या नेत्यांना एकप्रकारे आव्हान देणे यातून पवार यांचा भाजपला संदेश द्यायचा हेतू स्पष्ट होते. पवार यांच्या पक्षाला पूर्व नागपूरची जागा मिळाली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यानंतर येथे काँग्रेसची ताकद आहे, राष्ट्रवादी पवार गटाची ताकद नगण्य स्वरुपाची आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपात पूर्व नागपूर पवार गटाला सुटल्याने स्थानिक काँग्रेस नेते नाराज होते. काँग्रेसचा बंडखोरही रिंगणात आहे. काँग्रेस त्यांची ताकद पक्षाच्या बंडखोरामागे तर उभी करणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण पवार यांनी त्यांच्या पूर्व नागपूरमधील सभेचे चित्र वेगळे होते. त्यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना एका व्यासपीठावर आणून मतदारसंघाची निवडणूक पक्षाने गांभीर्याने घेतली असा संदेश भाजपला दिला आहे. ऐवढेच नव्हे पूर्व नागपूरमधील जातीय समीकरणात कुणबी फॅक्टरही तेली समाजाइतकाच महत्वाचा आहे. ही बाब लक्षात घेऊन पवार यांनी पश्चिमचे काँग्रेस उमेदवार आमदार विकास ठाकरे यांना पूर्वच्या सभेत सोबत घेतले. त्याचबरोबर पश्चिममध्ये काँग्रेसच्या विरोधात बंड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत ठाकरे यांचा समेट घडवून आणला. या घटनेमुळे पूर्वमध्ये काँग्रेस सक्रिय होईल व बेग यांच्या माघारीने पश्चिममधील मुस्लिम मतांचे विभाजन टळेल ही रणनिती पवारांची होती व त्यात ते यशस्वी झाले.

 

ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा

पवार गुरुवारी सकाळी नागपूर दौऱ्यावर आले. त्यांनी नागपूरमध्ये जाहीर सभा घेतली. त्यानंतर ते भंडारा जिल्ह्यात तिरोडा आणि नागपूर जिल्ह्यात काटोल येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले. काटोल येथील सभा आटोपून पवार रात्री नागपूरमध्ये आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नागपूरमधील काही काँग्रेस नेत्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. दक्षिण-पश्चिमसह सर्व सहाही मतदारसंघांची माहिती जाणून घेतली. दक्षिण-पश्चिममध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाची मते आहेत. सर्वांना सोबत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे समजते. नागपूरची निवडणूक भाजपसाठी जेवढी महत्वाची आहे तेवढीच राज्य पातळीवरील विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठीही महत्वाची आहे. पवार यांनी घेतलेल्या बैठकीकडे याच अनुषंगाने बघितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *