रशियामध्ये होत असलेल्या १६ व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेले आहेत. आज परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. २०२० साली गलवान येथे दोन्ही राष्ट्रांचे सैनिक एकमेकांना भिडल्यानंतर भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसेच मंगळवारी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवरील काही संवेदनशील ठिकाणी गस्त घालण्यासंबंधी भारत आणि चीनदरम्यान सहमती झाल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी करण्यात आली होती. त्यामुळे पाच वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणारी चर्चा ही महत्त्वाची मानली जात आहे. याआधी २०१९ साली तामिळनाडूमधील महाबलीपूरम येथे दोन्ही नेते भेटले होते. बाली (२०२२) आणि जोहान्सबर्ग (२०२३) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीदरम्यानही पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले होते. पण आज होणारी बैठक ही द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी नियोजित बैठक आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मेस्सी रशियातील काझान येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान अनेक आठवड्यांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. सहमतीमधून सैन्यमाघारी आणि २०२० मध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निवारण होईल. आता या दिशेने आणखी पावले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच चीननेही सीमाप्रश्नावर चर्चेतून तोडगा काढला जात असल्याचे म्हटले होते. पण सीमेवर गस्त घालण्यासंदर्भात कोणताही उल्लेख चीनकडून करण्यात आला नव्हता. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान म्हणाले की, भारत आणि चीनमधील सीमारेषेवरील प्रश्नांसंबंधी दोन्ही देशांच्या लष्काराने एकमेकांशी वेळोवेळी संवाद साधून मार्ग काढला आहे. चीन भारताला सहकार्य करत असून लवकरच तोडगा काढला जाईल. मात्र कोणत्या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे? याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.