नीना गुप्ता यांचे पती आहेत सीए, पत्नीच्या ‘या’ आर्थिक गुंतवणुकीची खिल्ली उडवतात विवेक मेहरा

Spread the love

नीना गुप्ता आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या त्यांच्या आयुष्याबद्दल आणि निर्णयांबद्दल मुलाखतीत बोलत असतात. नुकतंच करीना कपूरशी ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये बोलताना नीना यांनी आर्थिक गुंतवणुकीबद्दल सांगितलं. नीना गुप्ता यांचे पती विवेक मेहरा सीए आहेत. ते नीना यांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी कसे मार्गदर्शन करतात हे सांगितलं. जगण्यासाठी पैसा खूप कसा महत्त्वाचा आहे, याबद्दल नीना गुप्ता म्हणाल्या, “मी माझ्या पैशांबद्दल नेहमीच विशेष आहे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की पैसा सगळं काही नाही, पण आता मी हे शिकलोय की पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकतं. तुम्ही पैशाने प्रेमही विकत घेऊ शकता, त्यामुळे पैसा सगळं काही आहे.” करीना नीना गुप्ता यांच्या मताशी सहमत होत म्हणाली, “मी हे करिश्मा आणि सैफलाही सांगते आणि माझ्या मुलांनाही सांगते.” अनेकदा जास्त परतावा मिळत नसला तरी एफडीमध्ये पैसे गुंतवणं आवडतं, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं. “माझ्याकडे माझे पैसे असायला हवेत. माझा नवरा कितीही काळजी घेणारा असला आणि तो माझी काळजी घेत असला तरी मला आर्थिक सुरक्षितेसाठी पैसे हवे असतात. त्यामुळे मी एफडी करून घेते. माझे पती सीए आहेत म्हणून ते म्हणतात की एफडी करणे हा सर्वात मूर्ख निर्णय आहे, कारण त्यातून सर्वात कमी परतावा मिळतो. पण मला एफडी केल्याने चांगलं वाटतं. मात्र ते सर्वजण माझी खिल्ली उडवतात,” असं नीना गुप्ता म्हणाल्या. नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “मी आणि माझे सर्व मित्र त्यांच्याकडून आर्थिक सल्ला घेतो. ते खूप चांगले आहेत, ते कोणालाही मदत करतात. मसाबा त्यांना विचारल्याशिवाय कोणताच व्यावसायिक निर्णय घेत नाही. त्यांनी आधीही तिला खूप मदत केली आहे.” विवेक मेहरा व नीना गुप्ता यांनी २००८ मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी नीना यांचं वय ४९ वर्षे होतं. विवेक मेहरा सीए असून मूळचे दिल्लीचे आहेत. नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यांचे ‘मेट्रो इन दिनों’, ‘पचहत्तर का छोरा’, ‘हिंदी विंदी’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *