बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या येथे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे डिसेंबरामध्ये महिला संवाद यात्रा काढणार आहेत. याबद्दल माध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी हे वक्तव्य केलं असून याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘महिला संवाद यात्रा’ काढली जाणार आहे. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जदयू नेते लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार हे “नयन सेंकने जा रहे हैं” म्हणजेच महिलांना पाहण्यासाठी जात आहेत, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे.ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल देखील बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भाष्य केले. लालू प्रसाद यादव म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधाला काही अर्थ नाही. आम्ही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊ. ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व दिले पाहिजे (इंडिया आघाडीचे). याबरोबरच लालू प्रसाद यादव यांनी आम्ही २०२५ मध्ये पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वासदेखील यावेळी व्यक्त केला.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधाकांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच संधी मिळाल्यास आपण नेतृत्व करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. बॅनर्जी म्हणाल्या की, “मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. मी इंडिया आघाडी बनवली होती. जे लोक या आघाडीचं नेतृत्व करत आहेत त्यांनी ही आघाडी सांभाळली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे. परंतु, त्यांना ती आघाडी सांभाळता येत नसेल तर त्यात मी काय करू शकते. मी फक्त एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पुढे जायला हवं.” दरम्यान लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लालूजी हे शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यांना काही लक्षात येत नाहीये आणि ते काहीही बोलत आहेत.” बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने संपूर्ण राज्यात चालवल्या जाणाऱ्या ‘महिला संवाद यात्रा’ या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी २२५.७८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या यात्रेमध्ये महिला सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. ही यात्रा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलांशी त्यांना येणार्या समस्यांवर थेट संवाद साधणार आहेत.