देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

Spread the love

देवेंद्र फडणवीस यांना अनाजीपंत महाराष्ट्राचं राजकारण बिघवणारे नेते म्हणून टीका करणारे संजय राऊत यांचा आणि संजय राऊत यांना महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे असं देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि संजय राऊत यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान हे दोन्ही नेते भेटले आणि सदिच्छा भेट झाली. त्यामुळे या फोटो ऑफ द डे ची चर्चा रंगली आहे. ज्या दोन नेत्यांच्या मधून एरवी विस्तवही जात नाही असे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. ते जेव्हा एकमेकांना हसत खेळत भेटतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा चर्चा तर होणारच.

संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना काय काय म्हणाले आहेत?

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बिघडवलं. अत्यंत घाणेरड्या पातळीवर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणून ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत. देवेंद्र फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाटणारं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे, राजकीय प्रेम आहे. सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना विदर्भ वेगळा करायचा होता. त्यासाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता. अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. शिवाय याआधीही संजय राऊत यांनी अनेकदा याच प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कायमच राजकारणात माझा स्तर ठेवा असं म्हणत त्यांच्याविषयी उत्तर देणं टाळलं आहे. “संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात मी त्यांच्यावर बोलत नाही. संजय राऊत लंडनमध्ये आहेत असं कळलं तिकडे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. योग्य औषध त्यांनी घ्यावं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस हे कायमच संजय राऊत यांच्याबाबत मला प्रश्नच विचारु नका असं म्हणत आहेत. राजकारणात माझा स्तर जरा ठेवा असं देवेंद्र फडणवीस कायमच म्हणत असतात. महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुरू आहे. सरकारकडून विविध योजना, विकासकामं जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत. तर विरोधक सरकार कुठल्या पातळ्यांवर कमी पडलं ते सांगत आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या जाहीरनामा या कॉनक्लेव्हच्या दरम्यान खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही क्षणांसाठी भेट झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी संजय राऊत यांच्याशी हस्तांदोलन केलं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) संजय राऊतांना म्हणाले, आजचा हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की तेवढा तर आलाच पाहिजे. यानंतर दोघंही मनमुरादपणे हसले आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करुन निरोप घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय विरोधकांनाही हसतमुखाने भेटण्याची परंपरा आहे ही संस्कृती यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली आहे. ती आपणही टिकवली आहे हेच जणू काही हा फोटो सांगतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *