सावंतवाडी : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या आहेत. या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला २ हजार ५०० इतका भाव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे आज शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकवणे हे खूप कठीण बनत चालले आहे. अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता.हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळून देखील बऱ्याच वेळा पडला मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती यात त्यांना यशही आले त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजनबद्ध कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पिक जपण्याचा प्रयत्न केला. यावर्षीच्या देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे. यावर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी यांच्या पेढीवर पाठविल्या असून यातील एका डझनच्या पेटीला २ हजार ५०० असे दोन हापूसच्या पेटींना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे यावेळी धुरी यांनी सांगितले. दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढली आहे.