दयानंद चोरघे यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी; चोरघे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप

Spread the love

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसचे नेते दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु उमेदवारी जाहीर होताच, हिरमोड झालेल्या इच्छूकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून तब्बल १९ जण इच्छूक होते. या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणीही जोर धरत होती. चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार महेश चौघुले असून या निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चौघुले यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे दयानंद चोरघे, माजी आमदार राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह अनेकजण उमेदवार मागणी करत होते. शनिवारी रात्री भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच, राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. चोरघे हे भिवंडी ग्रामीण मतदार संघात राहतात. त्यामुळे चोरघे हे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप राशीद ताहीर मोमीन यांनी केला. भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे राशीद ताहीर मोमीन असेही म्हणाले. चोरघे यांच्या उमेदवारी नंतर आता काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान चोरघे यांच्या समोर आहे. तर दुसरीकडे चोरघे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. भिवंडी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून चोरघे हे निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु त्यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. चोरघे यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले होते. या निवडणूकीत बाळ्या मामा यांनी भाजपचे नेते कपिल पाटील यांचा पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *