‘आग ही आग’ या १९८७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात चंकी पांडे, धर्मेंद्र, गुलशन ग्रोवर आणि नीलम कोठारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला त्यावेळी लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने आरती चौधरी नावाचे पात्र साकारले होते. तिची भूमिका लोकांना फार आवडली होती. आता नीलमने या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला आहे. चंकी पांडेने केलेल्या एका कृतीमुळे नीलम प्रचंड चिडली होती आणि त्याचा जीव घ्यावा असं वाटत होतं, असा खुलासा तिने स्वतः केला आहे. नीलम सध्या नेटफ्लिक्सवरील सीरिज ‘फॅब्युलस लाईव्हज व्हर्सेज बॉलीवूड वाइव्हज’मध्ये दिसणार आहे. भावना पांडे, रिद्धिमा कपूर आणि महीप कपूरसह अनेक स्टार्सच्या पत्नी या शोमध्ये दिसत आहेत. नीलमने या शोमध्ये ‘आग ही आग’ चित्रपटातील चंकी पांडेबरोबरचा एक प्रसंग सांगितला. चंकीमुळे तिचा पाय भाजला होता, ती खूण आजही असल्याचं ती म्हणाली.
चंकी पांडेचा जीव घ्यावा वाटत होता – नीलम
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत ‘हम साथ साथ है’ फेम अभिनेत्रीने सांगितलं की चंकी तिचा खूप चांगला मित्र आहे. आधीदेखील तो चांगला मित्र होता. मात्र एक काळ असा होता जेव्हा मला त्याचा जीव घ्यावासा वाटत होता. “तो मला सेटवर त्रास द्यायचा कारण तो नवीन होता आणि खूप वेळ घ्यायचा. ‘शॉट तयार आहे, कॅमेरे सेट आहेत, पण चंकी पांडे कुठे आहे… तर चंकी पांडे बाथरूममध्ये असायचा. हे फक्त एकदाच वगैरे घडलं नव्हतं, तर खूपदा व्हायचं. त्यामुळे मला त्याचा जीव घ्यावा वाटत होता”, असं नीलम म्हणाली. नीलम पुढे म्हणाली, “‘आग ही आग’ सिनेमात एक सीन होता, ज्यामध्ये माझं लग्न दुसऱ्याशी होत होतं आणि चंकीला बाईकवर यायचं होतं. मला मंडपातून उचलून बाईकवरून निघून जायचं होतं. मी त्याला १० वेळा विचारलं की त्याला बाईक चालवता येते का? तो हो म्हणत होता. मात्र मला माहीत नव्हतं की तो गंमत करतोय.” नीलम म्हणाली, “त्याने मला बाईकवर बसवलं आणि इतक्या जोराने एक्सीलेटर दाबलं की बाईकचं संतुलन बिघडलं आणि मी वधूच्याच वेशात खाली पडले, नंतर माझ्यावर बाईक पडली. माझा पाय भाजला. मला त्याचा जीव घ्यावा वाटत होता. त्या शूटिंगवेळी झालेल्या जखमेची खूण अजूनही माझ्या पायावर आहे. ती खूण दाखवून मी अजूनही चंकीला त्या सीनची आठवण करून देत असते. तुझ्यामुळे ही खूण आयुष्यभर माझ्यासोबत राहीलं, असं मी म्हणते.”