भाजपाचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साईटवरील इन्फ्लूएन्सर गजाभाऊ नावाचे हँडल चालविणाऱ्या व्यक्तीला उघड धमकी दिली होती. कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स हँडलला टॅग करून धमकी दिली आहे. कंबोज यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर गजाभाऊ हँडलवरूनही मोहित कंबोजला प्रत्युत्तर देण्यात आले. हा दोन सोशल मीडिया हँडलवरील वाद राजकारणातही पोहोचला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गजाभाऊ नामक हँडलची बाजू घेऊन भाजपावर टीका केली होती. आता गजाभाऊ हँडल चालविणारा व्यक्ती पहिल्यांदाच समोर आला असून त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत भाजपा आणि मोहित कंबोज यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
मोहित कंबोज शॅडो गृहमंत्री
गजाभाऊ या हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमधील व्यक्ती म्हणतो, “महायुती सरकारचा शपथविधी झाला. मात्र दोन-तीन दिवस आधीपासून धमक्या देण्याचे सत्र सुरू झाले होते. धमक्या देण्यात सर्वात आघाडीवर होते मोहित कंबोज. त्यांनी सोशल मीडियावरील अनेक कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत. मोहित कंबोजचा इतिहास सर्वांना माहीत आहे. पण तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शॅडो गृहमंत्री झाला आहे.” ‘मोहित कंबोज खंडणी उकळू शकतो’
गजाभाऊ नामक हँडलवरून पोस्ट केलेल्या व्हिडीओतील इसम पुढे म्हणतो, “मोहित कंबोज आता मुंबईतील खंडणीखोर होईल. त्यामुळेच मोहित कंबोज अशा धमक्या देत आहे. येत्या काळात त्याच्यामार्फत मुंबईतील बॉलिवूड आणि बिल्डरांकडून खंडणी वसूल केली जाईल. जे काम पूर्वी किरीट सोमय्याकडून केले जात होते, ते आता मोहित कंबोज यांच्याकडून केले जाईल.” “गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज यांच्याबरोबर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दिसत आहेत. हे सरकारला मोहित कंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या परिसरात खंडणीखोरी सुरू करेल”, असा आरोप गजाभाऊने केला आहे.