अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील विविध कायद्यांमध्ये बदल करण्याच्या घोषणांचा धडाका लावला आहे. अशात आता ट्रम्प यांनी देशात वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या पालकांच्या पोटी जन्मलेल्या पाल्यांना देशाचे ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ बहाल करणाऱ्या कायद्यात बदल करणार असल्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एनबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या येणाऱ्या चार वर्षांच्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या सर्व स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी हे प्रमुख आश्वासन होते. यावेळी ट्रम्प यांनी असेही सांगितले की, ते डेमोक्रॅट्ससोबत एक करार करण्यासाठी तयार आहेत, ज्याद्वारे ‘ड्रीमर्सचे (मुले म्हणून अमेरिकेत प्रवेश केलेल्या बेकायदेशीर स्थलांतरित) संरक्षण होईल आणि त्यांना देशात राहता येईल. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ते त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची कोणती महत्त्वाची कामे करणार आहेत, त्याबद्दलही सांगितले. यामध्ये ते, धोरणांमध्ये बदल, इमिग्रेशन आणि फौजदारी न्याय यावर काम करणार असल्याचे म्हणाले. न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार, डोनाल्ड ट्रम्प गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर कॅपिटलमध्ये (US Capitol) दंगल करणाऱ्यांना माफ करण्याबरोबर स्थलांतरितांच्या जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणाऱ्या कायद्यात बदल करणार आहेत.
कॅपिटलमधील हल्लेखोरांना माफी देण्याचा विचार
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जाहीर केले आहे की, पुढील महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी, ते ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हल्ल्यात दोषी ठरलेल्या त्यांच्या समर्थकांना माफी देणार आहेत. कॅपिटल हिल परिसरात ६ जानेवारी २०२१ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनासाठी जमलेल्या लोकांनी तेथे घुसखोरी केल्याने त्यांचा पोलिसांशी संघर्ष उडाला होता. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. यावेळी पोलिसांशी झालेल्या मध्ये झटापटीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता.