डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल्वे मार्गातून प्रवास

Spread the love

डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी जिन्यावरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी आणि मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गातून प्रवास करत आहेत. दररोज जीवाशी खेळ करत या रेल्वे मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे मार्गातून प्रवास करत असताना तैनातीवरील रेल्वे सुरक्षा जवान करतात काय, असे प्रश्न जाणत्या प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरातून पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई, विरार, डहाणू, बोईसरकडे जाण्याचा मधला मार्ग म्हणून या भागातील बहुतांशी प्रवासी मध्य रेल्वे मार्गावरील जमिनीवरील कोपर रेल्वे स्थानकात उतरून तेथून अप्पर कोपर रेल्वे स्थानकात जातात. तेथून वसई, डहाणू, पनवेल भागातील प्रवास रेल्वेच्या शटल सेवेने करतात. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा दादरमार्गे वसई, विरार, डहाणू भागात जाण्याचा सुमारे एक ते दीड तासाचा फेरा वाचतो. त्यामुळे बहुतांशी प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील प्रवासाला प्राधान्य देतात. अप्पर कोपर रेल्वे स्थानकात शटलमध्ये चढण्यासाठी, उतरण्यासाठी फलाटावरील गर्दीमुळे, जिना चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी प्रवासी फलाटावर उतरण्याऐवजी विरुद्ध बाजूने रेल्वे मार्गात उतरतात. तेथून रेल्वे मार्गातून चालत जमिनीवरील कोपर रेल्वे स्थानकात जातात. या रेल्वे स्थानकात सरकता जिना नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. दिवा-वसई, डहाणू-पनवेल, डोंबिवली-बोईसर रेल्वे मार्गावर शटल सेवा खूप तुरळक प्रमाणात आहे. एक ते दोन तासांनी या रेल्वे मार्गावर शटल धावतात. त्यामुळे या शटल सेवेला प्रवाशांची तुफान गर्दी असते. निश्चित वेळेत येणारी शटल उशिरा किंवा रद्द झाली तर दोन ते तीन शटलमधील प्रवाशांचा भार एकच लोकलवर येतो. त्यामुळे मिळेल ती शटल पकडून प्रवासी इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न प्रवासी करतात. सकाळी ७.५५ वेळेत अप्पर कोपर रेल्वे स्थानकात डहाणू-पनवेल शटल येते. बहुतांशी नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी वर्ग या शटलने प्रवास करतो. अनेक प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकात उतरून तेथून जमिनीवरील कोपर रेल्वे स्थानकात येतात. तेथून ठाणे, मुंबई, कल्याण, बदलापूर, आसनगावपर्यंतचा भागाच प्रवास करतात. सकाळी ५.५९ ची डोंबिवली-बोईसर शटल गेल्यानंतर थेट सकाळी १०.२० ची पनवेल-वसई शटल आहे. ही शटल वेळेत नाही आली तर प्रवाशांची कुचंबणा होते. या मधल्या वेळेत शटल वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे मार्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी अधिकचे जवान येथे तैनात करण्याची प्रवाशांची मागणी आहे. सकाळच्या या भागात रेल्वे सुरक्षा बळाचा एक जवान असतो. पण त्यांना प्रवासी दाद देत नसल्याचे चित्र आहे. अधिक माहितीसाठी रेल्वे सुरक्षा जवान विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळेत बहुतांशी नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी वर्ग प्रवास करतो. प्रत्येकाची कामावर, महाविद्यालय, खासगी शिकवणीत जाण्याची घाई असते. त्यामुळे जिन्यावरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी प्रवासी रेल्वे मार्गातून प्रवास करतात. हे थांबविण्यासाठी रेल्वेने रेल्वे मार्गात लोखंडी रोधक बसविले पाहिजेत. – प्रवीण प्रधान, प्रवासी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *