मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्यामुळे दरवर्षी सुमारे २४१ कोटी रुपयांची बचत होणार आहे. कोणताही हस्तक्षेप न होता प्रक्रिया पार पाडल्याने ही मोठी बचत शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या एसटीच्या उत्पन्नापेक्षा दररोज १ ते २ कोटी रुपयांनी खर्च अधिक होत असल्याने केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षात डिझेल बचतीबरोबरच जाहिरातींद्वारे सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एसटीमध्ये आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि स्वावलंबन वाढवणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढील आर्थिक वर्षात स्क्रॅपिंग प्रकल्प राबविणे, चालक-वाहकांच्या ड्युटी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिकालीन भत्त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच इतर उपाययोजना अंमलात आणून किमान ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
एसटीला सक्षम व टिकाऊ बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, या उपाययोजनांमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.