ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

Spread the love

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह कोकण पट्ट्यातील १८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार आहेत. यामध्ये ठाणे शहर, कळवा-मुंब्रा, भिवंडी आणि पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्वच विधानसभा मतदार संघाचा समावेश असून यातील शहापूर मतदार संघामध्ये सांबरे यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली असल्याने या मतदार संघात त्यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यासह इतर मतदार संघात सांबरे यांच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भिवंडी लोकसभेची निवडणूकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भाजपतर्फे माजी मंत्री कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे या तीन उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे ६६ हजार १२१ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना ४ लाख ९९ हजार ४६४ इतकी मते मिळाली. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना ४ लाख ३३ हजार ३४३ मिळाली. तर सांबरे हे ८० ते ९० हजार मते घेतली अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी २ लाख ३१ हजार ४१७ इतकी मते घेऊन सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला. महायुतीचा प्रभाव असलेल्या मुरबाड, शहापूर आणि भिवंडी ग्रामीण मतदार संघात सांबरे यांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे या मतदार संघामध्ये सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. तर, महाविकास आघाडीचा प्रभाव असलेल्या भिवंडी पश्चिम आणि पूर्व मतदार संघातही सांबरे यांनीं चार हजारांच्या आसपास मते घेतली आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदार संघात सपाचे आमदार रईस शेख यांनीं शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांचा १ हजार ३१४ मतांनी पराभव केला होता. तसेच भिवंडी पश्चिम मतदार संघात भाजपचे आमदार महेश चौगुले यांनी एमआयएम पुरस्कृत अपक्ष उमेदवार खालीद गुड्डू यांचा १४ हजार ९१२ इतक्या मतांनी पराभव केला होता. त्यामुळे सांबरे यांच्या उमेदवारांनी या मतदार संघात लोकसभे इतकी मते घेतली तरी त्याचा फटका भिवंडी पूर्वेत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *