जर्मनीला भारतीय कामगारांची आवश्यकता का? भारतीयांसाठी जर्मनीने वाढवला ‘व्हिसा कोटा’

Spread the love

जर्मनीत सध्या वयोवृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. जर्मनीला कुशल कामगार मिळावे, यासाठी जर्मन चॅन्सेलर स्कोल्झ ओलाफ यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कामगार व मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी जर्मनीने भारतीय नागरिकांसाठी वार्षिक व्हिसा कोटा २०,००० हून ९०,००० हजारांपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी जर्मनीत दरवर्षी फक्त २०,००० हजार भारतीय नागरिकांना व्हिसा दिला जात होता. आता ९०,००० भारतीयांना दरवर्षी व्हिसा देण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय तरुणांना मोठ्या संख्येने जर्मनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच जर्मन व्हिसाचा प्रतिक्षा कालावधीदेखील कमी करण्यात आला आहे. जर्मनीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असल्याने तिथे कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जर्मनीला तरुण कामगारांची आवश्यकता आहे. जर्मनीत २०१४ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांची होती. २०३० पर्यंत जर्मनीतील ३५ टक्के लोकसंख्या ही ६० वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या नागरिकांची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आतापासूनच जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्याकडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. भारतातून जर्मनीत जाणाऱ्या कामगारांना मुख्यत: आभियांत्रिकी व आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी असतील. तसेच रुग्णसेवा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, ट्रक चालक, बालसंगोपन या क्षेत्रांमध्ये देखील रोजगार उपलब्ध होणार आहेत. जर्मनीच्या विदेश मंत्री अॅनालेना बेअरबॉक या देखील भारत दौऱ्यावर आल्या असून त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “भारतात कुशल कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हाला जर्मनीमध्ये कामगारांची आवश्यकता आहे. त्यामुळे जर्मनीने घेतलेल्या निर्णयाचा फायदा हा जर्मनीसह भारताला देखील होणार आहे.” दरम्यान, जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ हे मागील दोन वर्षात तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत.

जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय विद्यार्थी

जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे भारतीय आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जर्मनीत ४९,४८३ भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जर्मन अकॅडमीक एक्सचेंज सर्व्हिसच्या अहवालातून समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *