मुंबई : राज्यातील नागरिकांना महसूल सेवा सुलभ, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या अभियानांतर्गत आयोजित शिबिरांमध्ये जनसामान्यांच्या महत्त्वाच्या प्रकरणांना प्राधान्याने निकाली काढण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात आयोजित राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला. ७ आणि १४ मार्च रोजी पार पडलेल्या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या केवळ किरकोळ स्वरूपाच्या कामांपुरते मर्यादित न राहता जमीन नोंदी, वारस नोंद, सातबारा दुरुस्ती, नामांतरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांचाही प्राधान्याने निपटारा करण्यासाठी शिबिरांचे नियोजन करावे, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
या अभियानामुळे नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून सेवा अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अपर मुख्य सचिव विकास खारगे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच आमदार उपस्थित होते.