चैत्यभूमीवर ‘ईव्हीएम’विरोधात स्वाक्षरी मोहीम; भारतीय विद्यार्थी मोर्चाचा फलकाद्वारे निषेध

Spread the love

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दारुण पराभव पत्करावा लागलेल्या विरोधकांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करून निवडणूक प्रक्रियेला लक्ष्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर शिवाजी पार्क येथे ‘ईव्हीएम’विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविली. तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम’विरोधी आशय लिहिलेले फलक हाती घेऊन निषेध केला.विधानससभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे ३ ते १६ डिसेंबरदरम्यान राज्यात ‘ईव्हीएम’विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार महापरिनिर्वाणदिनी शिवाजी पार्कात ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ‘देशातील एक जबाबदार नागरिक आणि एक सुजाण मतदार म्हणून माझा ईव्हीएमवर अजिबात विश्वास नाही. निवडणूक ही ईव्हीएमवर न घेता पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) झाली पाहिजे, या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे’, असा मजकूर लिहिलेल्या भव्य फलकावर महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या नागरिकांनी स्वाक्षरी केली.भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाओ; लोकतंत्र बचाओ’, ‘गाव गाव में शोर है चुनाव आयोग चोर है’, अशा आशयाचे फलक हाती घेऊन ‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने करून मतपत्रिकेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच भारतीय युवा मोर्चातर्फे ‘मेरी पढाई; मेरे समाज के लिए’, ‘शाळा वाचवा-शिक्षण वाचवा-मुलांचे भविष्य वाचवा’, असे फलक झळकावण्यात आले. देशभरातील जनता ही ‘ईव्हीएम’च्या विरोधात आहे. जनता सार्वभौम असल्यामुळे तिच्या मताचा आदर राखून निवडणूक आयोगाने मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घ्यावे. ‘ईव्हीएम’विरोधी मोहीम गेल्या १४ वर्षांपासून भारतभर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *