श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्याचा दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर ५ डिसेंबरपासून खेळवला जात आहे. सामन्याच्या दुस-या दिवशी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने १०० विकेट्सचा टप्पा गाठला.त्यानंतर त्याने आपल्या वेगवान चेंडूने कागिसो रबाडाची बॅट तोडली. रबाडाच्या बॅटचे दोन तुकडे झाल्याची घटना कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडली. काइल वेरेन आणि कागिसो रबाडा यांच्यात ९व्या विकेटसाठी ७६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी झाली. ही भक्कम भागीदारी तोडण्यासाठी ९०व्या षटकात लाहिरू कुमाराला चेंडू देण्यात आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने १३७ च्या वेगाने जोरदार बाऊन्सर मारण्याचा प्रयत्न केला. रबाडा हा चेंडू डिफेंड करण्यासाठी गेला असता त्याची बॅट तुटली. या घटनेमुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला. गकेबरहा येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात त्यांनी पहिल्या डावात एकूण ३५८ धावा केल्या होत्या. यामध्ये रायन रिकेल्टन आणि काईल व्हेरेनी यांनी केलेल्या उत्कृष्ट शतकी खेळीने ही धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात, कागिसो रबाडा फलंदाजी करत असताना, लाहिरू कुमाराने टाकलेल्या ९०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रबाडाने फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, ज्यात चेंडू त्याच्या बॅटच्या हँडलजवळ आदळला. ज्यामुळे बॅटचे २ तुकडे झाले.रबाडाने केवळ एका हाताने या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्याने आधीच एका हाताने बॅट सोडली होती. पहिल्या डावात रबाडाने एकूण २३ धावा केल्या ज्यात त्याने ४० चेंडूंचा सामना केला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात २४२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये अँजेलो मॅथ्यूज ४० आणि कामेंदू मेंडिस ३० धावांवर नाबाद खेळत होते. याशिवाय पथुम निसांकाने ८९ धावांची खेळी केली तर दिनेश चंडिमलने ४४ धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून आतापर्यंत रबाडा, पॅटरसन आणि केशव महाराज यांनी गोलंदाजीत १-१ विकेट घेतले आहेत.