अभिनेता रुशद राणाने अनेक टीव्ही मालिका, हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता रुशद राणाने एका मुलाखतीत शाहरुख खानच्या ‘रबने बना दी जोडी’ या चित्रपटात भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे. याबरोबरच राणी मुखर्जीबरोबर असलेल्या बॉण्डिंगबद्दलदेखील वक्तव्य केले आहे. रुशद राणाने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मोहब्बतें’ या चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती. ती भूमिका शाहरूखला आठवते, हे जेव्हा मला समजले त्यावेळी मला आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्याने म्हटले, “मी ‘मोहब्बतें’मध्ये साकारलेली भूमिका शाहरुखला आठवते, असे त्याने ‘रब ने बना दी जोडी’ या शूटिंगवेळी सांगितले, त्यावेळी मला आश्चर्य वाटले. त्यानंतर राणी मुखर्जीने सांगितले की, तिची आई कृष्णा मुखर्जी माझ्या कामाची मोठी चाहती आहे, त्यावेळी मला खूप आनंद झाला होतो. ‘कहता है दिल’ या टीव्ही शोमध्ये मी काम करीत होतो. तो शो खूप लोकप्रिय होता. राणीची आई तो शो रोज बघायची. राणीसुद्धा अनेकदा तिच्याबरोबर हा शो बघत असे. तिने मला एकदा म्हटले होते, “टीव्ही शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे मला कौतुक वाटते. इतके डायलॉग तुम्ही लक्षात कसे ठेवता?”, तो संवाद मला स्पष्टपणे आठवतो. ‘रब ने बना दी जोडी’मध्ये राणी मुखर्जी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. त्या संपूर्ण शूटदरम्यान तिने खूप चांगली वागणूक दिली”, असे अभिनेत्याने म्हटले आहे.
पुढे अभिनेत्याने ऐश्वर्या राय बच्चन आणि प्रीत झिंटा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटले, “‘वीर झारा’ चित्रपटात प्रीती झिंटा आणि ‘मोहब्बतें’ चित्रपटात ऐश्वर्या राय यांच्याबरोबर कोणताही संवाद झाला नाही. त्यांनी दुर्लक्ष केले. अशा वेळी आपण काय करणार? जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले असेल, तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकत नाही”, अशी कटू आठवण त्याने सांगितली आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बतें’ चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. आठ वर्षांनंतर ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पुनरागमन केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप हिट झाला होता. शाहरूख खान आणि अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३१ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५७ कोटींची कमाई केली होती.