महाविकास आघाडीत गोंदिया विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास सामूहिक राजीनामे देणार, असा इशारा ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे पदाधिकारी ही जागा आपल्याच वाट्याला येणार, असे ठामपणे सांगत आहेत. वर्ष २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल येथून विजयी झाले होते. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा भाजपचेच बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल (अपक्ष) यांनी पराभव केला होता. त्यापूर्वी, शिवसेनेकडून १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा गोंदिया विधानसभेतून आमदार राहिलेल्या रमेश कुथे यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सहा वर्षांनंतर जुलै महिन्यात त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेकडून दोनदा आमदार राहिल्यामुळे ठाकरे गटाकडून कुथे यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली गेली. मात्र, गोपालदास अग्रवाल सप्टेंबर महिन्यात भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये परतले. नेमकी येथूनच वादाला सुरुवात झाली.
अग्रवाल यांनी ही जागा काँग्रेसलाच सुटणार, असे सांगत शिवसेना ठाकरे गट येथे कमकुवत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी चांगलेच भडकले. यानंतर पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही अग्रवाल यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे जाहीरपणे सांगितले. यावरून ही जागा काँग्रेसला सुटल्यास अग्रवाल हेच उमेदवार असतील, असे निश्चित मानले जात आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला विरोध करीत ठाकरे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी धर्म पाळला. मात्र, काँग्रेसचे खासदार निवडून आल्यानंतर एकदाही त्यांनी शिवसेना कार्यालयाला भेट दिली नाही. शिवसेनेने या मतदारसंघात चांगले काम केले असून पक्षसंघटना मजबूत केली आहे. त्यामुळे येथून शिवसेना उमेदवारालाच तिकीट मिळावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. असे न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार आणि निवडणूक प्रचाराचे कोणतेही काम करणार नाही. वेळ आलीच तर आघाडी धर्म विसरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.