मुंबई ( प्रमोद देठे): गिरगावातील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरील रखडलेल्या कामामुळे अखेर अपघात घडला असून मॅजेस्टिक परिसरात एका दुचाकीस्वाराला खड्ड्यात कोसळून दुखापत झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेट्रो-३च्या कामानंतर रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला असताना योग्य बॅरिकेडिंग न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक तरुण दुचाकीवरून जगन्नाथ शंकर शेठ मार्गाने जात असताना गिरगावातील मॅजेस्टिक परिसरात पालिका कंत्राटदाराने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात अचानक तोल जाऊन दुचाकीसह खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण जखमी झाला असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खड्ड्याभोवती लावण्यात आलेल्या बॅरिकेडमध्ये मोठा मोकळा भाग ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो थेट खड्ड्यात कोसळला. तर काहींनी टॅक्सीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेल्याचा दावा केला. मात्र अपुऱ्या बॅरिकेडिंगमुळेच अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून मेट्रो-३च्या कामामुळे हा मार्ग आधीच नागरिकांसाठी त्रासदायक ठरला आहे. त्यातच रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदकाम करून काम रखडल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. योग्य सुरक्षाव्यवस्था न करता रस्ते खोदून ठेवण्याच्या पालिका कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजसेवकांनी केली आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालिकेच्या कंत्राटदारांचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.