लोकसभा पोट निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोहचल्या आहेत. त्यानंतर आज पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. भाषणाच्या सुरूवातीलाच प्रियंका गांधी यांनी १३ डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्यावेळी संसदेच्या सुरक्षा करत असताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचार्यांना श्रध्दांजली अर्पण केली.संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहासमोर माडल्या. याबरोबरच संविधानाने महिलांना लढण्याची शक्ती दिल्याचेदेखील प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांनी सांगितलं की, “मी उन्नाव येथे बलात्कार पीडितेच्या घरी गेले होते. तिची जाळून हत्या करण्यात आली होती. ती कदाचित २०-२१ वर्षांची असेल. आपल्या सगळ्यांना मुले आहेत. आपण विचार करू शकतो की आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार झाला आणि जेव्हा ती आपली लढाई लढण्यासाठी गेली तेव्हा तिला जाळून ठार करण्यात आले, तर आपल्याला काय सहन करावे लागत असेल.” “मी त्या मुलीच्या वडीलांना भेटले. त्यांची शेती जाळून टाकण्यात आली होती. तिच्या भावांना आणि वडीलांना मारहाण करण्यात आली होती. त्या मुलीच्या वडीलांनी सांगितलं की मुली मला न्याय हवा आहे. माझी मुलगी एफआयआर दाखल करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेली तर तिथे तो करून घेतला गेला नाही. तिला दुसर्या जिल्ह्यात जावे लागले. ती रोज सकाळी सहा वाजता उठून एकटी ट्रेनने दुसर्या जिल्ह्यात जात होती. तिच्या वडीलांनी मला सांगितलं की मी तिला एकटी जाऊ नको म्हणालो, हा लढा सोडून दे. तर तिने मी एकटी जाईन आणि माझी लढाई मी स्वत: लढेन असं तिच्या वडीलांना सांगितलं. ही लढण्याची क्षमता आणि हिंमत त्या आणि देशभरातली कोट्यवधी महिलांना संविधानाने दिली आहे”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
तर संविधान बदलण्याचं काम सुरू झालं असतं
प्रियांका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, “आपले संविधान एक सुरक्षा कवच आहे जे देशातील लोकांना सुरक्षित ठेवते. वाईट गोष्ट ही आहे की सत्ता पक्षातील सहकारी जे मोठमोठ्या गोष्टी करतात त्यांनी गेल्या १० वर्षात हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.” “संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे वचन एक सुरक्षा कवच आहे. लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे. जर लोकसभा निवडणुकीत हा निकाल आला नसता तर यांनी संविधान बदलण्याचे काम देखील सुरू केले असते”, असेही प्रियांका गांधी त्यांच्या पहिल्या भाषणात बोलताना म्हणाल्या.आज लोकांची मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, याचा उल्लेख सत्ताधारी पक्ष करत आहेत त्याचे कारण देखील निवडणुकीत आलेले निकाल आहेत असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींवर टीका
प्रियांका गांधी यांनी आपल्या संसदेतील पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, त्या म्हणाल्या की, पंतप्रधान येथे सभागृहात संविधानाचे पुस्तक डोक्याला लावतात. पण संभल, हाथरस मणिपूर येथे न्यायाची मागणी केली जाते तेव्हा त्यांच्या कपाळावर रेषदेखील दिसत नाही. कदाचित त्यांना समजलेले नाही की भारताचे संविधान संघाचे विधान नाही.