कैदी क्रमांक ७६९७, रात्रभर फरशीवर झोपला अन्…; अल्लू अर्जुनने तुरुंगात ‘अशी’ घालवली रात्र

४ डिसेंबरला हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रिमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक झाली. एक रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तुरुंगातून बाहेर पडला.अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं होतं. इंडिया टुडेने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनचा कैदी क्रमांक ७६९७ होता. तो रात्रभर चंचलगुडा तुरुंगातील बॅरेकमध्ये फरशीवर झोपला होता. त्याने रात्रभर काहीही खाल्लं नव्हतं. शुक्रवारी या प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी कारागृहाच्या मागच्या गेटने बाहेर पडला.अभिनेत्याला शुक्रवारी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नामपल्ली न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. तेलंगणा हायकोर्टाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.अल्लू अर्जुनला शुक्रवारी जामीन मिळूनही तुरुंग प्रशासनाने सोडलं नाही, यावरून त्याच्या वकिलांनी टीका केली. “त्यांना हायकोर्टाकडून आदेशाची प्रत मिळाली पण तरीही त्यांनी अल्लू अर्जुनला सोडलं नाही. त्यांना याचं उत्तर द्यावे लागेल. हे बेकायदेशीर होतं, आम्ही कायदेशीर कारवाई करू,” असं अभिनेत्याचे वकील अशोक रेड्डी म्हणाले.शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती, त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अभिनेत्याला रात्र तुरुंगात काढावी लागली, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी पीटीआयला दिली. तसेच अंतरिम जामीन आदेशात त्रुटी होती, त्यानंतर एक नवीन आदेश जारी करण्यात आला, जो शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहात पोहोचला. आला. जामिनाच्या प्रतीची तपासणी करणं आवश्यक होतं, त्यामुळे अभिनेत्याची शुक्रवारी सुटका करणं शक्य नाही, असं तुरुंग प्रशासनाने नमूद केलं होतं. अखेर आज (शनिवारी, १४ डिसेंबरला) सकाळी त्याची सुटका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *