भारत वि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यात २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत भारताला ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यादरम्यान, केएल राहुल पुढच्या सामन्यात खेळणार की त्याला बाहेर बसावे लागणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. आता मुख्य प्रशिक्षकांनी या प्रकरणावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. केएल राहुलची बॅट सध्या शांत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला सातत्याने पाठिंबा देत आहेत. आता पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी मुख्य प्रशिक्षकांना विचारले असता, ते म्हणाले की, प्लेइंग इलेव्हनचा निर्णय सोशल मीडियावरून होत नाही. गौतम गंभीर म्हणाले, “सोशल मीडियावर कोण काय बोलत आहे याने काही फरक पडत नाही. संघ व्यवस्थापन काय विचार करते, हे महत्त्वाचं आहे. तो फलंदाजी चांगली करतो, कानपूरच्या (भारत वि बांगलादेश दुसरी कसोटी) अवघड खेळपट्टीवर त्याने चांगली खेळी केली होती. त्याला माहितीय की त्याला मोठी धावसंख्या करण्याची गरज आहे आणि तो मोठी धावसंख्या उभारू शकतो. याच गोष्टीमुळे संघ व्यवस्थापनही त्याला पाठिंबा देत आहे. अखेरीस प्रत्येकाच्या कामगिरीचं समीक्षण होतं, प्रत्येकाच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुमच्या खेळाची विभिन्न निकषांतून समीक्षा केली जाते.” गौतम गंभीर यांच्या या वक्तव्यानंतर पुणे कसोटीतील प्लेईंग इलेव्हनमध्ये केएल राहुल खेळणार हे निश्चित आहे. पण मग आता शुबमन गिल की सर्फराझ खान यांच्यापैकी कोणाला संधी देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण सर्फराझ खानने आजवर मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला आहे आणि बेंगळुरूमध्ये १५० धावांची शानदार इनिंग खेळली. पण जर शुबमन गिल प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला तर सर्फराझला बाहेर जावे लागेल. जो एक कठीण निर्णय असेल.
ऋषभ पंतच्या दुखापतीवर गौतम गंभीरने दिले मोठे अपडेट
पत्रकार परिषदेदरम्यान कोच गंभीर यांनी एक चांगली बातमीही दिली. त्यांनी सांगितले की ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट आहे आणि पुढील सामन्यासाठी तयार आहे. बंगळुरू कसोटीतच ऋषभ पंत ज्या ठिकाणी अपघातात जखमी झाला होता त्याच ठिकाणी त्याला दुखापत झाली. यानंतर तो यष्टीरक्षण करताना दिसला नाही. त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी केली, पण शेवटच्या डावात न्यूझीलंड फलंदाजीला आला तेव्हा ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडताना दिसला. पण आता ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियाकडून खेळताना दिसणार हे जवळपास निश्चित झाले आहे.