आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यात न्यूजीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी मात करत प्रथमच जेतेपद पटकावले. त्याचबरोबर क्रिकेट जगताला टी-२० विश्वचषकाचा नवा विजेता मिळाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद १२६ धावाच करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरला आहे.
न्यूझीलंडची ही तिसरी विश्वचषक फायनल होती. आता २० ऑक्टोबर हा दिवस न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी २४ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला आहे. याआधी न्यूझीलंड संघाने २००० साली महिला वनडे विश्वचषक जिंकला होता. मात्र, महिला टी-२० विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरले आहे. तसेच यंदाही दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’चा शिक्का पुसण्यात अपयशी ठरला आहे. कारण या संघाचा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा निराशाजनक क्षण आहे. या सामन्यातील पराभवानंतर त्यांचा संघ खूपच निराश दिसत होता. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सलग दुसरा टी-२० विश्वचषक फायनल खेळत होता. यासोबतच त्यांचा संघ दुसऱ्या अंतिम फेरीतही पराभूत झाला. गेल्या फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून पराभव झाला होता, तर यावेळी त्यांना न्यूझीलंडच्या महिला संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामनाही जून २०२४ मध्ये खेळवण्यात आला होता. जिथे त्यांच्या पुरुष संघाचाही भारतीय संघाने अंतिम फेरीत ७ धावांनी पराभव केला होता. एकंदरीत, दक्षिण आफ्रिकेने गेल्या एका वर्षात तीन टी-२० विश्वचषक फायनल गमावल्या आहेत.