महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अनेक पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणय्यास सुरुवात केली आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीनाट्य, पक्ष बदलण्याचे प्रकार घडत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे मेळावे होत आहेत. प्रचारसभा, रॅली आणि विविध कार्यक्रम घेतले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा वेध आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ठरले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार, हे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. एकही उमेदवार ठरला नसून जागांवरून राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) या पक्षांमध्ये चिंचवड आणि भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील पेच कायम असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. मुंबई, पुण्याच्या वाऱ्या सुरू आहेत. तिन्हींपैकी एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन पाच दिवस झाले. परंतु, अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. दुसरीकडे महायुतीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने पिंपरीतून आमदार अण्णा बनसोडे, भाजपने चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांचा प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात पिंपरी -चिंचवडमधील एकाही जागेचा समावेश नाही. काँग्रेसला शहरातील एकही मतदारसंघ मिळण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे. माध्यमांशी बोलत असताना शालिनी विखे पाटील म्हणाल्या, “सुजय विखे पाटील दक्षिण अहमदनगरमध्ये मागच्या पाच वर्षांपासून काम करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुजय विखेंनी संगमनेरमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. यामुळे याविरोधात काहीतरी करावे लागेल, असा डाव त्यांनी आखला. विरोधकांच्या मनात कालच्या सभेनिमित्त विकृती निर्माण झाली, त्यातून त्यांनी कालचा गोंधळ घातला.” आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असून महाविकास आघाडीने अद्याप आपले सर्व उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तसेच अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे. दरम्यान, अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यापैकी काही जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांनीही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे, मविआचा नेमका उमेदवार कोण आणि मविआच्या अंतिम जागावाटपाबाबतचं चित्र कधी स्पष्ट होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे ४ नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल. त्याआधीच बऱ्याच गोष्टी पूर्ण होतील, आमच्याकडून त्या पूर्ण केल्या जातील. तसेच मैत्रीपूर्ण लढतींची लागण लागेल असं मला वाटत नाही”.