काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार

Spread the love

येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्षासह भारतीय जनता पार्टीनेही जोरदार तयारी केली आहे. अशात आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार येण्यापूर्वी दिल्लीत सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये मात्र सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. कारण लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्ली न्याय यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. पण ती अचानक रद्द करण्यात आली. काँग्रेसची बैठक रद्द केल्यानंतर काही तासांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसबरोबर युती करणार नसल्याचे दुसऱ्यांदा स्पष्ट केले. दरम्यान या दोन्ही घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, काँँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी अजूनही आशा आहे. दरम्यान काँग्रेस आणि आपचे दिल्लीतील नेते युतीची शक्यता नाकारत असले तरी पडद्यामागे अजूनही सुरू असलेल्या वाटाघाटींमुळेच नेतृत्त्वाला दोन्ही पक्षांच्या युतीची आशा आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की, “आम आदमी पक्ष दिल्लीत स्वतःच्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर युती होण्याची कोणतीही शक्यता नाही.” दुसरीकडे दिल्लीचे काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी वार्ताहरांना सांगितले की, “आम्ही विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार आहोत. आम्ही भ्रष्टाचारी केजरीवाल यांच्या पक्षाशी कोणतीही युती करणार नाही. त्यांच्याशी युती केल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागली आहे.”
केजरीवालांना दुखावण्याचे काँग्रेसने टाळले
दरम्यान राहुल गांधी यांची दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांची बैठकीतील अनुपस्थिती केंद्रीय नेतृत्त्व आणि दिल्ली काँग्रेस यांच्यात दिल्ली विधानसभा आणि आपबरोबरच्या युतीच्या मुद्द्याबाबत असलेला दुरावा अधोरेखित करते. ७ डिसेंबरला समारोप झालेल्या दिल्ली न्याय यात्रेत काँग्रेसचा कोणताही महत्त्वाचा नेता सहभागी झाला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आप सरकारला लक्ष्य करण्यासाठी आखलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊन केजरीवालांना विरोध करण्याचा धोका काँग्रेच्या केंद्रीय नेतृत्त्वाला पत्करायचा नव्हता. याबाबत काँग्रेस कमिटीतील सूत्राने सांगितले की, “भारत न्याय यात्रेत रोजच आम आदमी पक्षाला लक्ष्य केले जात होते. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे चुकीला संदेश गेला असता आणि युती होण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या.”
काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आपबरोबर युतीबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी कोणाला किती जागा सोडायच्या यावर एकमत होत नाही.” दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दहा दिवसांत त्यांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. दिल्ली काँग्रेसचे नेते देवेंद्र यादव म्हणाले की, “आमची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आप दबावाखाली येईल. आम्ही आपने ज्या जागांवर उमेदवार जाहीर केले नाहीत त्या जागांवर आमचे उमेदवार जाहीर करू.” दरम्यान आम आदमी पक्षाने आतापर्यंत ३१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी १६ विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे पुत्र संदीप दिक्षित, पाच वेळचे आमदार हारून यूसुफ, महिला काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *