ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्या टी-२० सामन्यातही पाकिस्तानचा पराभव करून मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम गोलंदाजी करताना पाहुण्या संघाला १८.१ षटकांत ११७ गुंडाळले. यानंतर ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ गडी गमावून ११.२ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब करत मालिका ३-० ने फरकाने खिशात घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने संघाने न्यूझीलंड संघाचा मोठा विक्रम मोडत इतिहास घडवला आहे.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७ गडी राखून उडवला धुव्वा
तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला आहे. या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर सलग सातवा विजय आहे. याआधी कोणत्याही संघाला सलग इतक्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत करता आले नव्हते. २०२३ ते २०२४ या कालावधीत न्यूझीलंडने सलग सहा सामन्यांत पाकिस्तानचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया संघाबद्दल बोलायचे, तर या संघाने २०१९ पासून पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. त्याचबरोबर या मालिकेतही त्याने पाकिस्तानला एकही सामना जिंकू दिला आहे. श्रीलंका आणि इंग्लंडनेही सलग अनेक सामन्यांमध्ये पराभव केला आहे. श्रीलंका आणि इंग्लंडच्या संघांना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आले आहे. २०१९ ते २०२२ पर्यंत श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ सामन्यात पराभव केला होता. तर इंग्लंडने २०२२ ते २०२४ आणि त्यापूर्वी २०१२ ते २०१५ या कालावधीत सलग ५ सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलिया हा पाकिस्तानला सलग सर्वाधिक सामन्यात पराभूत करणारा संघ ठरला आहे. ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या १७ धावांवर आपली विकेट गमावली. पण यानंतर स्टॉइनिसच्या झंझावाताने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्टॉइनिसने २७ चेंडूत ५ चौकार आणि तितक्याचा षटकारांच्या मदतीने ६१ धावा करत सामन्याचा हिरो ठरला. त्याने शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांसारख्या गोलंदाजांच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला.