सातारा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्यांनी शनिवारी राजकीय नेत्यांसह माध्यमांची भेट टाळली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना मुख्यमंत्री शुक्रवारी अचानक आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी दाखल झाले आहेत. गावी आल्यापासून त्यांनी कोणाचीही भेट घेण्याचे टाळले. दिल्ली येथील सत्तास्थापनेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी पहाटे मुंबईत पोचले होते. त्यानंतर ते त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानीच होते. तेथूनच ते साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचले. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या गावी मोठ्या संख्येने माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असताना ‘मी विश्रांतीसाठी आलो आहे. कोणाशीही व राजकीय विषयावर काहीही बोलणार नाही,’ असे सांगत ते घरात गेले. शनिवारी दुपारी ते त्यांना भेटण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांशी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी बोलणे टाळले.
मुख्यमंत्र्यांचे सहकारी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्यांच्या भेटीसाठी दरे गावी आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नाही. ते तातडीने मुंबईला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या गावी पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा प्रशासनातील व वाई उपविभागातील अधिकारी उपस्थित आहेत.
घशाचा आजार, उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांना घशाचा आजार झाला असून, त्यांना तापही आला आहे. त्यांची साताऱ्यातील डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु त्यांनी कोणाचीही भेट घेतलेली नाही. त्यांनी माध्यमांशीही बोलणे टाळले. सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री मुंबईला परतणार असून त्यानंतरच ते राजकीय चर्चांमध्ये सहभाग घेतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.