ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

Spread the love

आयपीएल २०२५ च्या महालिलावात स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी विक्रमी बोली लावत लखनौ सुपर जायंट्सने आश्चर्यचकित केले. लखनौने पंतसाठी २७ कोटींची विक्रमी बोली लावली. लखनौने सनरायझर्स हैदराबादला मागे टाकत पंतसाठी सर्वाधिक २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पूर्वीच्या कर्णधारासाठी राईट टू मॅच कार्ड वापरण्यासाठी संमती दर्शवली वापरले. लखनौहून अंतिम किंमत विचारली असता, मालक संजीव गोयंका यांनी थेट २७ कोटी रुपये सांगितले. किंमत ऐकून दिल्लीच्या संघाने माघार घेतली आणि ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल झाला. पण दिल्लीच्या संघाने पंतला रिटेन का केलं नाही, यामागचं कारण संघ मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत पुढील मोसमात लखनौ सुपर जायंट्सची जर्सी घालणार आहे. यासह, ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीबरोबर असलेला दीर्घ प्रवास संपला. पंतच्या जाण्याने संघाचे सहमालक पार्थ जिंदाल भावूक झाले. RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “दादा (सौरव गांगुली) नंतर माझा आवडता क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे. मी खरोखर भावूक झालोय आणि दुःखी आहे, की मी माझा आवडता क्रिकेटपटू गमावला. तो माझा कायम आवडता क्रिकेटपटू राहील पण लिलाव पाहून मी खूप खूश आहे.” पार्थ जिंदाल पुढे म्हणाला, “ज्या क्षणी आम्ही ऋषभला रिटेन केलं नाही त्याच क्षणी आम्ही त्याला गमावलं होतं. लिलावात आपण त्याला परत संघात घेऊ असा आत्मविश्वास ठेवणंच चूकीचं आहे. जर मी त्या किमतीत राईट टू मॅच (RTM) चा वापर केला असता, तर दिल्ली कॅपिटल्सचा (DC) लिलाव खराब झाला असता. ऋषभ पंत १८ कोटी रुपये आणि २७ कोटी रुपये या पूर्णपणे वेगळ्या ऑफर्स आहेत.” ऋषभ पंतने एका मेसेजमध्ये म्हटले होते की त्याने पैशांच्या मुद्द्यामुळे दिल्लीचा संघ सोडला नाही. तर पार्थ जिंदाल म्हणाले की, आम्ही त्याला रिटेन केलं नाही. असं आहे तर मग दिल्लीच्या संघाचे एकच मालक असते तर निर्णय वेगळा असता का? या प्रश्नावर उत्तर देताना जिंदाल यांनी सांगितले की त्यांनी आणि डीसी सहमालक जीएमआर यांनी ऋषभ पंतला रिलीज करण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली होती. जिंदाल प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, “मला वाटत नाही की हे ओनरशिपबद्दल आहे,. ओनरशिपबद्दल बोलायला गेलो तर आम्ही समान आहोत. हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. आम्ही याबाबत ऋषभ पंतबरोबर खूप चर्चा केली होती. ऋषभ पंतकडून ज्या कामगिरीची अपेक्षा होती ती कामगिरी गेल्या मोसमात आणि त्याच्यापूर्वीच्या मोसमात पाहायला मिळाली नाही. याबाबत आम्ही ऋषभ पंतला इमानदारीने आणि स्पष्ट बोलत प्रतिक्रिया दिली होती.” पुढे ते म्हणाले, “JSW, GMR किरण (ग्रंथी) आणि मी, आम्ही एक कुटुंब आहोत. हा आम्ही एकत्र मिळून घेतलेला निर्णय होता. पण आम्ही जी प्रतिक्रिया दिली त्याच्यावर आम्हाला जो पंतकडून प्रतिसाद मिळाला तो आम्हाला अपेक्षित नव्हता. ऋषभने भावनिक निर्णय घेतला. तो या फ्रँचायझीमध्ये मोठा झाला आहे.” पार्थ जिंदाल ऑक्शनमधील किस्सा सांगताना पुढे म्हणाले, “पंतने सुरुवात केली तेव्हा तो युवा खेळाडू होता. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला पहिली संधी दिली. जे झालं ते मला नको होतं. आमची यावर बरीच मोठी चर्चा झाली. शेवटी ऋषभने ठरवले की त्याला या संघाबरोबर राहायचे नाही. किरण आणि मी दोघांनी त्यांची समजूत घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण त्याने ठरवलं की त्याला वेगळ्या दिशेने जायचं आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा मान ठेवला. त्यावेळी मी त्याला म्हणालो, “ऋषभ, ठीक आहे, तुझ्यासाठी लिलावात मी बोली लावणार नाही. पण ऑक्शनमध्ये मी भावुक होत पुन्हा त्याच्यावर बोली लावली आणि पुन्हा त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावर लागलेली किंमत खूपच वाढली आणि आम्हाला माघार घ्यावी लागली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *