इराण, पॅलेस्टाईन व लेबेनॉनच्या दूतांचे JNU मधील व्याख्यान रद्द

Spread the love

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) इराण, पॅलेस्टाईन व लेबेनॉन या देशांच्या भारतातील राजदूतांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पश्चिम आशियातील इस्रायल, इराण, पॅलेस्टाईन व लेबेनॉन या देशांमध्ये सध्या युद्धसंघर्ष चालू आहे. त्याचे पडसाद आता जेएनयू विद्यापीठात उमटले आहेत. इराणचे भारतातील राजदूत डॉ. इराज इलाही यांचे नियोजित व्याख्यान विद्यापीठाकडून अचानक पुढे ढकलण्यात आले, तर लेबेनॉन व पॅलेस्टाईन या देशांच्या भारतातील राजदूतांचे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. ‘पश्चिम आशियातील घडामोडींकडे इराण कसे पाहतो?’ या विषयावर इराणचे राजदूत डॉ. इराज इलाही हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते. गुरूवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यान सकाळी आठ वाजता विद्यापीठाकडून अचानक रद्द करण्यात आले. तसेच पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू अल-हाइजा यांचे ७ नोव्हेंबर व लेबेनॉनचे राजदूत डॉ. राबी नार्श यांचे १४ नोव्हेंबरला होणारे व्याख्यान देखील रद्द करण्यात आले. ‘पॅलेस्टाईनमधील हिंसाचार’ व ‘लेबनॉनमधील परिस्थिती’ हे त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते. जेएनयू विद्यापीठाच्या पश्चिम आशिया अभ्यास केंद्राकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे. जेएनयू विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’च्या वरिष्ठ सदस्यांनी या कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली. अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये फूट पडून आंदोलने व निदर्शने होण्याची शक्यता असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत जेएनयू ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’चे अधिष्ठाता अमिताभ मट्टू म्हणाले, “आपण अशा जगात राहत आहोत जिथे भावना सहज दुखावल्या जाऊ शकतात”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *